New Road Safety Rules : कोरोना काळात बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. अशातच अनेक पालक आपल्या मुलांना शाळेच्या बस ऐवजी स्वतः शाळेत सोडायला जातात. यामध्येच असे अनेक पालक आहेत, जे आपल्या मुलांना दुचाकीने शाळेत सोडतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना हेल्मेट घालत नाही. अशा पालकांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पिलियन रायडरसाठी (पिलियन रायडर म्हणजेच दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती) रस्ता सुरक्षेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे, असं न केल्यास दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो. 


चार वर्षांखालील मुलांसाठी विशेष नियम 


रस्ते वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लहान मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना हे नियम लागू होतील. 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे आवश्यक असेल. तसेच दुचाकीची वेग 40 किमी प्रतितास पर्यंत मर्यादित असावा, असे या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. या नवीन वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 दंड आणि तीन महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाऊ शकते.


 







कसे असावे सेफ्टी हार्नेस 


सेफ्टी हार्नेस हलके, जलरोधक आणि गादीयुक्त असावे. ज्यामध्ये मूल विश्रांती घेऊ शकतील. तसेच त्याची क्षमता 30 किलोपर्यंत भार सहन करण्याची असावी. हा नियम लागू झाल्यानंतर हेल्मेट आणि सेफ्टी गियर बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. 


सध्या सायकल हेल्मेटचाही करू शकता वापर 


अद्याप बीआयएसने (BIS) लहान मुलांच्या हेल्मेटसाठी स्वतंत्र मानक जारी केलेलं नाही. तोपर्यंत लहान मुलांसाठी सायकल हेल्मेटचा देखील वापरता केला जाऊ शकतो. सरकारने 25 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा रस्ता सुरक्षेसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम (CMVR), 1989 मध्ये सुधारणा करण्यासाठी ही मसुदा अधिसूचना आणली होती.


अपघातात लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2019 साली रस्ते अपघातात 11,168 मुलांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दिवसाला 31 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 2018 सालच्या तुलनेत रस्ते अपघातात मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात 11.94 टक्के म्हणजे 1,191 एवढी वाढ झाली आहे. 


 





हेही वाचा :