प्रयागराज : देशभरातून लाखो, कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात (Kumbhmela) जाऊन दर्शन घेत आहेत. गंगा नदीतील पवित्र कुंडात डुबकी घेऊन स्नान करत आहेत. पंतप्रधान, राष्ट्रवादी, मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेतेमंडळी, सेलिब्रिटी, आमदार-खासदारही कुंभमेळ्यात सहभागी होऊन धार्मिक पर्यटनाचा आनंद घेत आहेत. प्रयागराजमधील कुंडात डुबकी घेतलेल्या अनेक नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सपत्नीक कुंभमेळ्यात स्नान केल्याचं पाहायला मिळालं. कुंभेमळ्यासाठी प्रयागराजमध्ये (Prayagaraj) मोठी गर्दी उसळली असून रेल्वे स्थानक असो, विमानतळ असो किंवा बस स्थानक असो सर्वत्र प्रवासीच प्रवासी दिसत आहेत. दरम्यान, प्रयागराज रेल्वे स्थानकावरील एका फोटो व्हायरल झाला असून चक्क माजी मुख्यमंत्री रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात असल्याचं दिसून येत आहे. आपल्या पत्नीसमवेत सर्वसामान्य प्रवाशांसह तेथील एका कठड्यावर ते बसल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा यांनी नुकतेच पत्नी मीरा यांच्यासह प्रयागराज येथील पवित्र कुंडात स्नान केले. येथील दर्शन घेतल्यानंतर व अध्यात्मिक डुबकी मारल्यानंतर ते परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत होते. मुंडा यांचा रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला आहे, त्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे ते आपल्या पत्नीसोबत ट्रेनची वाट पाहात असल्याचे दिसून येते. यावेळी, कित्येक लोकं, प्रवासी त्यांच्याजवळून येतात आणि निघून जातात पण कोणालाही त्यांची ओळख लक्षात येत नाही. विशेष म्हणजे अंगावर शाल ओढून ते इकडे-तिकडे पाहात असल्याचंही दिसत आहे. यावरुन, त्यांच्या साधेपणाची चर्चा आणि सहजतेमुळे सोशल मीडियातून त्याचं कौतुक होत आहे.
व्हीआयपी सुरक्षेशिवायचा साधेपणा
अर्जुन मुंडा यांची ओळखच सर्वसामान्यांचा नेता व सर्वसामान्य नेता अशी आहे. आपल्या मतदारसंघातही ते नागरिकांसोबत सहजतेनं कुठंही रममाण होतात. त्यामुळेच, कुंभमेळ्याला पत्नीसोबत आल्यानंतर त्यांनी कुठलीही व्हीआयपी सुरक्षा घेतली नाही, किंवा व्हीआयपी असल्याचा आव आणला नाही.
योगी सरकारचे अभिनंदन
महाकुंभमेळ्यातील नियोजन व व्यवस्थेचं त्यांनी कौतुक केलंय. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुकही केलं आहे. महाकुंभमधील पवित्र स्नान कुंडात स्नान करुन आज प्रयागराज येथून झारखंडला परत आलो आहे. भव्य आयोजनासाठी केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन. कोट्यवधि भाविक या आस्थेच्या महाकुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. त्यासाठी, सरकारने उत्तम व्यवस्था व नियोजन केलं आहे. या आयोजनासाठी झटणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, सर्वांचे मनापासून आभार! असे अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे.
