New Delhi: दिल्लीच्या सिव्हिल लाईन्समधील (Civil Lines) मजनू का टिला परिसरात मंगळवारी (30 मे) पहाटे एका 36 वर्षीय महिलेला स्वत:च्याच मैत्रिणीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. दोघीही एकाच फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन दोघा मैत्रिणींमध्ये बाचाबाची झाली, पीडितेने आरोपी महिलेच्या वडिलांना शिवीगाळ केली, ज्यामुळे आरोपी महिलेने स्वत:च्या मैत्रिणीवरच चाकूने वार केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सपना ही फंक्शन्समध्ये वेटर (Waiter) म्हणून काम करायची. सपनाचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी सातच्या सुमारास त्यांना या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना 35 वर्षीय राणीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला आणि त्यावेळी सपना देखील तिथे उपस्थित होती.
तपासादरम्यान सपनाने गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाने पोलिसांना सांगितलं की ती आणि राणी मजनू का टिला येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. राणी गुरुग्राममधील ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlour) काम करायची.
सोमवारी (29 मे) रात्री सपना आणि राणी त्यांच्या नेहा नावाच्या मैत्रिणीच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत एका डिनर पार्टीसाठी गेल्या होत्या. सपना आणि राणी दारूच्या नशेत होत्या आणि त्याच वेळी त्यांच्यात भांडण सुरू झाले. पार्टीनंतर दोघीही त्यांच्या फ्लॅटवर परतल्या आणि तिथेही दारू पिणं सुरूच ठेवलं. रात्री साडेचारच्या सुमारास दोघींमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान सपनाने राणीच्या छातीवर चाकूने वार केले आणि यातच तिचा मृत्यू झाला.
सपनाने पोलिसांना सांगित्याप्रमाणे, राणीने तिच्या मृत वडिलांना शिवीगाळ केली आणि त्यामुळे सपनाने राणीवर हल्ला केला. राणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तिथे तिचा मृत्यू झाला.
पोलिस उपायुक्त सागर सिंग कलसी म्हणाले, एफएसएल आणि गुन्हे अन्वेषण पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत सपनावर खुनाशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाच्या आधारे आरोपी सपना हिला अटक केली असून तिने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. घटनेत वापरलेला चाकू जप्त करण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टमनंतर राणीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: