Uttar Pradesh: प्रत्येकाच्याच आयुष्यात मैत्रीला (Friendship) महत्त्वाचं स्थान असतं. रक्ताचं नातं नसलं तरी ते आयुष्यभर सोबत राहतं. प्रत्येकजण आपल्या मित्रासाठी काहीही करायला तयार असतो. निःस्वार्थी मैत्रीच्या नात्यासाठी अनेक जण आपला प्राण देखील द्यायला तयार होतात आणि असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील (UP News) फिरोजाबादमध्ये पाहायला मिळाला. मित्राच्या मृत्यूनंतर दुःख सहन न झाल्याने एका व्यक्तीने मित्राच्याच चितेत (Funeral) उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं.


फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावातील ही घटना आहे. आपल्या बालपणीच्या मित्राच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या एका 42 वर्षीय व्यक्तीने शनिवारी यमुनेच्या काठावर अंत्यसंस्कार पार पडत असताना आपल्या मित्राच्या जळत्या चितेत उडी घेतली. लोकांना समजेपर्यंत तो 95 टक्के भाजला होता आणि नंतर आग्रा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथेच त्याचा मृत्यू झाला.


फिरोजाबादचे एसपी कुमार रणविजय सिंह यांनी रविवारी सांगितलं की, अशोक कुमार लोधी (वय 44) फिरोजाबाद जिल्ह्यातील नागला खंगार गावातील रहिवासी होते. काही महिन्यांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी शेजारील गाडिया पंचवटी गावातील त्यांचे मित्र आनंद गौरव राजपूत (वय 42) तेथे उपस्थित होते. बालपणापासूनची मैत्री संपुष्टात आली तेव्हा आनंदला हा धक्का सहन झाला नाही. अशोकची चिता जळत असताना आनंदने त्यात उडी घेतली.


एसपी पुढे म्हणाले की, जेव्हा लोक अंत्यसंस्कार करुन चिता पेटवून घरी परतत होते, तेव्हाही आनंद तिथेच बसून रडत राहिला. 'दोस्त में आता हूं' असं ओरडून आनंद राजपूतने अचानक पेटत्या चितेत उडी घेतली. जळत्या चितेत उडी घेतल्यामुळे आनंद 95 टक्के भाजला गेला, त्याला बाहेर काढेपर्यंत त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


आनंद राजपूत यांचा मोठा भाऊ कमल यांनी सांगितलं की, दोघांमध्ये लहानपणापासून घट्ट मैत्री होती आणि आनंदला मित्राचा मृत्यू सहन झाला नाही. दोघेही एकाच शाळेत गेले आणि दोघांनी एकाच दिवशी लग्नही केले. अशोक लोधी एक निष्णात ढोलकी वादक होता, तर माझा भाऊ त्याच्यासोबत झांज वाजवत असे. त्यांना अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये संगीत वाजवायला बोलावले जायचे आणि त्या दोघांची जोडी देखील लोकप्रिय असल्याचं ते म्हणाले.


या दोघांची मैत्री गावात चांगलीच गाजली होती. ते दोघे शेतात तासनतास गाणी गाण्यात घालवायचे आणि अनेकदा एकत्र जेवण करायचे. दोघेही स्वभावाने धार्मिक आणि विनम्र होते, असं गावकऱ्यांनी सांगितलं.


अशोक लोधी याला काही महिन्यांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पाच मुलींचे वडील असलेल्या आनंद राजपूत याने अशोकच्या वैद्यकीय खर्चात हातभार लावला. अशोकनेही मित्राच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी खर्च केला होता.


अशोक लोधी यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. अशोक आणि आनंद या दोघांचीही मुलं एकाच शाळेत शिकतात.


या घटनेला एसएचओ महेश सिंह यांनी आत्महत्या करून मृत्यूचं प्रकरण म्हटलं आहे आणि त्यामुळे याबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही.


हेही वाचा:


Cheapest Electricity: 'या' देशात लोकांचं वीज बिल येतं मायनसमध्ये; सरकारही चिंतेत! जाणून घ्या त्यामागचं कारण