नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडलं. यामध्ये सर्वाधिक लक्ष लागलेल्या दिल्लीतील सात मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. या ठिकाणी आप आणि काँग्रेसने आघाडी केली असून त्यांनी भाजपसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं चित्र आहे. 


अशी असेल दिल्लीतील लढत, 


चांदणी चौक – प्रवीण खंडेलवाल (भाजप) विरूद्ध जे.पी. अग्रवाल (काँग्रेस)


उत्तर पुर्व दिल्ली - मनोज तिवारी (भाजप) विरूद्ध कन्हैया कुमार (काँग्रेस)


उत्तर पश्चिम दिल्ली - योगेंद्र चंदोलिया (भाजप) विरूद्ध उदित राज (काँग्रेस)


पूर्व दिल्ली - हर्ष मल्होत्रा (भाजप) विरूद्ध कुलदीप कुमार (आप)


नवी दिल्ली - बांसुरी स्वराज (भाजप) विरूद्ध सोमनाथ भारती (आप)


पश्चिम दिल्ली - कमलजीत सेहरावत (भाजप) विरूद्ध महाबल मिश्रा (आप)


दक्षिण दिल्ली - रामवीर सिंग बिधुरी (भाजप) विरूद्ध साही राम (आप)


दिल्लीतील लोकसभा मतदारसंघांची राजकीय स्थिती काय आहे ते सविस्तर पाहुयात, 


1) चांदनी चौक लोकसभा मतदारसंघ


देशाचे पंतप्रधान ज्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण देतात. तो लाल किल्ला चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ फक्त देशातच नाही तर जगात देखील प्रसिद्ध आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने या मतदारसंघात विजय मिळवला आहे. 


भाजपने या मतदारसंघातून व्यापारी वर्गातून येणाऱ्या प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला असून कॉंग्रेसने जेपी अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुस्लीम बहुल असलेल्या मतदारसंघात 20 टक्के मुस्लीम समाज आहे. तर दुसरीकडे 20 ते 21 टक्के अनुसूचित जातीतील लोक या मतदारसंघात राहतात.


चांदणी चौक हा व्यापाऱ्यांचा गड मानला जातो. भाजप उमेदवार असलेले प्रवीण खंडेलवाल हे व्यापाऱ्याच्या कनफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स चे महासचिव आहे. त्यामुळं भाजपला व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने तिकिट दिलेले जे पी अग्रवाल हे या मतदारसंघातील जुने जानते नेते म्हणून पाहिले जातात. राज्यसभा खासदार राहिलेल्या अग्रवाल यांच्यासमोर जुन्या कॉंग्रेस नेत्यांना सोबत घेण्यासोबतच आपच्या कार्यकर्त्यांचा मेळ राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण काँग्रेसचं पूर्वीसारखं संघटन राज्यात राहिलेले नाही. त्यामुळं काँग्रेसला आप वर अवलंबून राहावं लागणार आहे.


2) पश्चिम दिल्ली लोकसभा जागा


14 व्या लोकसभेदरम्यान या जागेवर पहिली निवडणूक झाली होती. या जागेवर पूर्वांचल भागातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 2019 ला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचा मुलगा प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना भाजपला तिकिट दिलं होतं. या निवडणूकीत प्रवेश सिंह वर्मा यांचा मोठा विजय झाला होता. मात्र, भाजपने यावेळेला प्रवेश सिंह यांचं तिकिट कापत महिला उमेदवार कमलजीत सेहरावत यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाने पूर्वांचल सबंध असणाऱ्या माजी खासदार महाबल मिश्रा यांना मैदानात उतरवलं आहे.


पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप गेल्या दोन वेळेपासून निवडणूक जिंकत आहे. मात्र, या लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 10 विधानसभा जागांवर आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. त्याचवेळी या जागेवर महाबल मिश्रा यांची असलेली पकड आम आदमी पक्षासाठी जमेची बाजू आहे. महाबल मिश्रा मूळचे बिहारचे आहेत. पश्चिम दिल्लीत बिहारमधील लोक मोठ्या संख्येने राहतात. अशा परिस्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी या जागेवर वेगवेगळ्या खेळी केल्या आहेत. त्यामुळं यावेळी जोरदार लढत पाहायला मिळत आहे. मात्र या मतदारसंघात आपचं पारडं जड मानलं जात असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियत आजही कायम आहे. त्यामुळं भाजपला मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा होण्याची शक्यता आहे.


3) उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ


दिल्लीतील सात जागांपैकी सर्वात हॉट सीट म्हणून उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. कारण भाजपच्या मनोज तिवारी यांच्या विरोधात कन्हैया कुमार यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. मनोज तिवारी हे भोजपूरी सिनेमाचे गायक आणि सुपरस्टार आहेत. सध्या ते सक्रिय राजकारणात असून भाजपने त्यांना तिसऱ्यांदा निवडणूकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाची सुरुवात करणारा कन्हैय्या कुमार यांच्यावर राहुल गांधी यांनी विश्वास टाकला आहे. या भागात पुर्वांचल भागातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहेत. या मतांवर विशेष लक्ष करत कॉंग्रेसने कन्हैय्या कुमार यांना तिकिट दिलं आहे.


4) दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघ


दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपने रामवीर सिंह बिधुरी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी इंडियाआघाडीकडून ही जागा आम आदमी पक्षाच्या पारड्यात पडली असून 'आप'ने सहिराम पहेलवान यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण दिल्लीची जागा गुर्जर बहुल जागा मानली जाते. त्यामुळेच या जागेवर दोन्ही पक्षांनी गुर्जर उमेदवार उभे केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे रमेश बिधुरी विजयी झाले होते. मात्र भाजपने त्यांचं तिकिट कापलं आहे.


दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघासाठी 1967 मध्ये पहिली निवडणूक झाली, ज्यामध्ये भारतीय जनसंघाचा विजय झाला होता. आतापर्यंत झालेल्या 13 निवडणुकांमध्ये काँग्रेसने 4 वेळा तर भाजपने 7 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजेच या लोकसभा जागेवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे. बिजवासन, पालम, मेहरौली, छतरपूर, देवळी, आंबेडकर नगर, संगम विहार, कालकाजी, तुघलकाबाद, बदरपूर विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघांमध्ये येतात


5) उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ 


अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या दिल्लीतील हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सूफी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा 2019 ला मोठा विजय झाला होता. यावेळी भाजपने उत्तर पश्चिम मतदारसंघातून योगेंद्र चंदेलिया यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने उदित राज यांना उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये भाजपने उदित राज यांना पक्षाचे तिकीट दिले होते. त्यानंतर त्यांनी आप उमेदवार राखी बिर्लान यांचा पराभव केला होता. भाजपने उदित राज यांचं 2019 ला तिकिट कापल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच यावेळी काँग्रेसने भाजपचे उमेदवार चंदेलिया यांच्या विरोधात उदित राज यांच्यावर डाव खेळला आहे. 


उत्तर-पश्चिम मतदारसंघांतर्गत 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. नरेला, बदली, रिठाळा, बवाना, मुंडका, किरारी, सुलतानपूर माजरा, नांगलोई जाट, मंगोलपुरी आणि रोहिणी हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. यापैकी रोहिणी विधानसभेत भाजपचे विजेंद्र गुप्ता हे आमदार आहेत. तर इतर सर्व जागांवर आपचे आमदार आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळवायचा असेल तर आपने आपली ताकद कॉंग्रेस माघे उभी करायला हवी. मात्र,अन्यथा कॉंग्रेसची वाट या मतदारसंघात कठीण असल्याचं चित्र आहे.


6) पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ


2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने क्रिकेटर गौतम गंभीरला उमेदवारी दिली होती आणि यात गौतम गंभीर मोठ्या फरकाने विजयी झाला होता. गंभीरने 55.33 टक्के मते मिळवून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी भाजपने हर्ष मल्होत्रा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. हर्ष मल्होत्रा 2015-16 ला दिल्लीचे महापौर होते. त्याचबरोबर यावेळी आम आदमी पक्षाने कोंडली विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुलदीप कुमार यांना उमेदवारी दिली आहे.यमुना नदी शुद्धीकरण त्याचबरोबर दिल्लीच्या इतर भागांच्या तुलनेत या भागात औद्योगिक विकास झाला नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळं या निवडणूकीत लोकांच्या विकासाचे मुद्दे निवडणूकीच्या केंद्रस्थानी असणार आहे.   


7) नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ


नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा राजधानीतील व्हीव्हीआयपी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कारण देशाच्या राष्ट्रपतींपासून पंतप्रधानापर्यंत सर्वच व्हीव्हीआयपी या मतदारसंघात राहतात. भाजपचे यावेळी बासुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. तर आपने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापत बासुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. बासुरी स्वराज या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत.


आम आदमी पार्टीने सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरील दोन्ही उमेदवार व्यवसायाने वकील आहेत. मतांची टक्केवारी वाढवणे हे दोन्ही पक्षांसाठी आव्हान असेल. आप आणि काँग्रेस यांच्या युतीमुळे समीकरणे बदलली आहेत. आप आणि कॉंग्रेस हे दोनही पक्ष स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही उमेदवार घरोघरी प्रचार आणि छोटय़ा छोटय़ा जाहीर सभांच्या माध्यमातून आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.


या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 10 मतदारसंघाचा समावेश आहे. या 10 विधानसभा मतदारसंघांपैकी करोलबाग आणि पटेल नगर हे राखीव विधानसभा मतदारसंघ आहेत. याच नवी दिल्ली मतदारसंघात भारतीय लष्कराचे बहुतांश लोक राहतात. म्हणून या मतदारसंघाला व्हीव्हीआयपी मतदारसंघ म्हणून पाहिलं जातं.


ही बातमी वाचा: