नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपल्या उमेदवाराच्या विजयासह पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावला. यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांना पराभूत करत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह 25 मतांनी विजयी झाले आहेत.

हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली तर बीके हरिप्रसाद यांना 105 मतं मिळवता आली. 245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, तर एक जागा रिक्त आहे. पण 230 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. एनडीएच्या या विजयात सर्वात मोठं योगदान बीजू जनता दलाचं आहे. अनेत मतभेदानंतरही बीजेडी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मतदान केलं.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरिवंश सिंह यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांना शुभेच्छा देत मिळून जनतेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं.

दोन वेळा मतदान
राज्यसभेत उपसभापती निवडणुकीसाठी दोन वेळा मतदान झालं. पहिल्या वेळी हरिवंश सिंह यांना 115 तर दुसऱ्या वेळी त्यांना 125 मतं मिळाली. पहिल्यांदा काही मतं योग्य पद्धतीने न झाल्याने पुन्हा मतदान घेण्यात आलं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनानंतर ओदिशाच्या बीजेडी, तामिळनाडूच्या एआयएडीएमके आणि तेलंगणाच्या टीआरएने एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना साथ दिली. त्यामुळे विरोधकांच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला.

कोण आहेत हरिवंश सिंह?
हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म 30 जून 1956 रोजी बलिया जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला होता. हरिवंश जेपी आंदोलनामुळे प्रेरित झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एमए आणि पत्रकारितेत डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स समूहातून केली होती.

बँक ऑफ इंडियातही नोकरी
यानंतर हरिवंश सिंह यांच्याकडे धर्मयुग या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1981 पर्यंत हरिवंश सिंह धर्मयुगचे उपसंपादक होते. यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि 1981 पासून 1984 पर्यंत हैदराबाद, पाटणामध्ये बँक ऑफ इंडियात नोकरी केली. 1984 मध्ये ते पुन्हा एकदा पत्रकारितेत परतले आणि 1989 पर्यंत त्यांनी 'आनंद बाजार पत्रिका'च्या 'रविवार' या साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काम केलं.

2014 मध्ये हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत
नव्वदच्या दशकात हरिवंश सिंह बिहारमधील एका मोठ्या मीडिया समूहात रुजू झाले. इथे त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं. आपल्या कार्यकाळादरम्यान हरिवंश सिंह यांनी बिहारशी संबंधित अनेक गंभीर विषयांना वाचा फोडली. याचदरम्यान त्यांची नितीश कुमार यांच्याशी जवळीत वाढली. त्यानंतर हरिवंश सिंह यांची जेडीयूचे सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली. 2014 मध्ये जेडीयूने हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामांकित केलं. अशाप्रकारे हरिवंश सिंह पहिल्यांदा संसदेत पोहोचले.