नवी दिल्ली:  देशात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात. पण कोरोना काळात शेतकऱ्यांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 11 हजार 716 व्यापारी आणि उद्योजकांनी आत्महत्या केली. तर या काळात 10 हजार 677 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोरोना महासाथीच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक अरिष्टामुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे म्हटले जात आहे.


2019 च्या तुलनेत 2020 मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये २९ टक्क्यांनी वाढ झालीय. तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना काळात व्यापाऱ्यांभोवतीही आर्थिक संकटाचा फास आवळला गेल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.


एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष 2020 मध्ये 11,716 व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर, याच कालावधीत एकूण 10,677 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. आत्महत्या केलेल्या 11,716 व्यावसायिकांमध्ये 4356 व्यापारी आहेत. तर, 4226 प्रकरणे ही वेंडर्सची आहेत. तर, उर्वरित प्रकरणे अन्य व्यावसायिकांशी निगडित आहेत.


एनसीआरबीने या तीन श्रेणीतच व्यावसायिक समुदायांशी निगडित असल्याचे अधोरेखित केले. वर्ष 2019 च्या तुलनेत व्यावासायिक समुदायामध्ये 2020 मध्ये आत्महत्यांच्या प्रकरणात 29 टक्क्यांची वाढ दिसून आली. व्यापाऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात 2019 च्या तुलनेत (2906) वर्ष 2020 मध्ये (4356) 49.9 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. देशभरात एकूण आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येच्या प्रकरणात 10 टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील वर्षभरात देशभरात 1,53,052 जणांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली.


कोरोना काळात अनेक लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव नसणे यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. मात्र, कोरोना काळात लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. व्यावसायिकही मोठ्या दबावात असल्याचे 'फेडरेशन ऑफ इंडियन माइक्रो स्मॉल और मीडियम एंटरप्राइज'चे सचिव अनिल भारद्वाज यांनी म्हटले. कोरोना महासाथीच्या आजारामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.