मुंबई: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना दुसऱ्यांदा पत्र लिहून लक्ष्यद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) यांची खासदारकी परत देण्याची मागणी केली आहे. फैजल यांची खासदारकी तात्काळ रद्द केली होती, मग ती परत देताना 14 दिवस होऊन गेले तरीही कारवाई का नाही करत असा सवाल त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना विचारला आहे.
मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिलासा दिला होता. कोर्टाने त्यांच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा करण्याचे आदेश दिले होते. मात्र केरळ उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी करताना फैजल यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द केलं होतं. परंतु कोर्टाने 10 ऑक्टोबरच्या सुनावणी वेळी हे देखील स्पष्ट केलं होतं की, मोहम्मद फैजल हे आपल्या लक्ष्यद्विप लोकसभेचं कामकाज पाहू शकतील. असं असताना देखील लोकसभा सचिवालयाने 14 दिवस उलटून देखील मोहम्मद फैजल यांची खासदारकी त्यांना पुन्हा देऊ केलेली नाही. याची आठवण करुन देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं असून तत्काळ लोकसभा अध्यक्षांना याप्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.
फैजल यांच्यावर आरोप काय आहेत?
फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. कावारत्ती सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फैजल यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने फैजल यांना दोषी ठरवलं आहे.
शरद पवार गटाकडे खासदारांची संख्या अधिक
निवडणूक आयोगात सध्या पक्ष आणि चिन्ह कुणाचं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचा लढा सुरु आहे. लोकसभेत सद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे. श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे खासदार आहेत. तर फैजल यांची खासदारकी अद्याप परत देण्यात आलेली नाही. तर अजित पवार गटासोबत सुनील तटकरे हे खासदार आहेत.
ही बातमी वाचा: