मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्स संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही. आतापर्यंत जो तपास करण्यात आला, तसेच ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्याचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच एनसीबी तपासातील रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी मुंबईत आलेले एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना आज सकाळी दिल्लीला परतले आहेत. काल राकेश अस्थाना यांनी आतापर्यंतच्या एनसीबीच्या तपासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
बॉलिवूड ड्रग्स कनेक्शनची पडताळणी करत असलेल्या दिल्ली-मुंबई एनसीबीच्या टीमकडून रिपोर्ट घेण्यासाठी स्वतः एनसीबी डीजी राकेश अस्थाना दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी त्यांच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी जवळपास 3 तास बैठक घेतली. ज्यामध्ये आतापर्यंतचा एनसीबीचा तपास, त्यामध्ये मिळालेले पुरावे, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे जबाब आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची करण्यात आलेली चौकशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
एवढंच नाहीतर या मीटिंगमध्ये 2019 मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीतील व्हायरल व्हिडीओसंदर्भातही चर्चा झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओचा फॉरेंसिक रिपोर्टही एनसीबीला मिळाला आहे. त्यातून व्हिडीओसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, करन जोहरनेही आधीच स्पष्ट केल्यानुसार, त्याच्या घरात पार्टी करण्यात आली होती. परंतु, त्यामध्ये कोणत्याही ड्रग्सचं सेवन करण्यात आलं नव्हतं.
दरम्यान, करन जोहर रविवारी गोव्याहून मुंबईत परतला आहे. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी शनिवारी एनसीबीने स्पष्ट केलं होतं की, आता कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला चौकशीत सहभागी होण्यासाठी समन्स देण्यात आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या :