पणजी : नौदलाचे मिग 29 के फायटर जेट विमान आज सकाळी सरावा दरम्यान दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळून अपघात झाला. विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

दाबोळी येथील आयएनएस हंसा येथून नियमित सरावासाठी उड्डाण घेतलेल्या मिग 29 के विमानाच्या इंजिनाला आग लागल्याने विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. विमान कोसळणार असल्याची कल्पना येताच पायलट कॅ. एम. शिवखंड व लेप्ट. कमांडर दीपक यादव यांनी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी घेतली. दोन्ही पायलट सुखरुपपणे जमीनीवर उतरले असून ते किरोकोळ जखमी झाले आहेत. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेली माहिती नुसार दोन्ही पायलट सुखरूप आहेत.

वेर्णा येथे औद्योगिक वसाहत आहे. तेथे अनेक कंपन्या आणि कारखाने आहेत. मात्र, विमान निर्मनुष्य ठिकाणी कोसळल्याने जीवितहानी टळली. विमान कोसळल्याचे दिसताच लोकांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रशासनाने लागलीच अग्निशामक दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटना स्थळावर पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पॅराशूटमधून उतरलेल्या दोन्ही पायलटला स्थानिकांनी मदत करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. नौदलाचे विमान शनिवारी नेमके कोणत्या कारणास्तव कोसळले याची चौकशी संबंधित यंत्रणोकडून केली जाईल. विमान कोसळल्यानंतर लोकांना धुराचे प्रचंड मोठे लोट येताना दिसले.

यापूर्वीही घडली होती घटना -
कवायतीवेळीही विमान दुर्घटना यापूर्वीच्या काळात देखील झालेल्या आहेत. मागील वर्षी 3 जानेवारीला देखील नौदलाच्या दाबोळी विमानतळावर दुपारी मिग-29 के लढाऊ विमान कोसळून अपघात झाला होता. कोसळताच विमानाने पेट घेतला. मात्र, प्रसंगावधान राखून पायलट सुखरुपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

संबंधित बातम्या -

आयएनएस खांदेरी पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, राजनाथ सिंहांच्या हस्ते जलावतरण

सैन्याबाबत मोदींची मोठी घोषणा : तिन्ही सैन्यदलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक