नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर शिवसेनेला या बैठकीचं अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याचीही चर्चा समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्त्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी राष्ट्रीय पातळीवरही वाढणार असल्याची चिन्ह आहेत.


येत्या सोमवारपासून (18 नोव्हेंबर) संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची उद्या बैठक पार पडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेतील दुरावे पाहता अधिवेशनात शिवसेनेची विरोधी भूमिका भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत बैठक व्यवस्थाही बदलली जाणार का? आणि शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर दिसणार का? याची आता उत्सुकता आहे.


उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व नेते उद्या मुंबईत हजर राहणार आहेत. सर्व आमदारांनाही उद्या मुंबईत हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. शिवसेनेसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने देखील शिवसेना उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे.



राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तुम्ही युतीतून बाहेर का पडलात? असं त्यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं. शिवसेनेकडून अद्याप युतीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आधी भाजपसोबतची युती तोडा आणि केंद्रातून सत्तेतून बाहेर पडा, अशी अट काँग्रेसकडून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.


राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाशिवआघाडी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी तिन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.