भोपाळ : भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. 2 डिसेंबर 1984 ला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे वायुगळतीची घटना घडली. यात कित्येक हजार लोकांचा मृत्यू तर, 1 लाखांपेक्षा अधिक लोक आजारी पडले होते. या पीडितांना कंपनीने केलेली मदत तुटपुंजी असल्याने अब्दुल जब्बार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते पीडितांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिले.
अब्दुल जब्बार यांच्यावर काही महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते स्वतः देखील भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडित होते. या घटनेत त्यांची 50 टक्के दृष्टी आणि फुफ्फुसातही संसर्ग झाला. जगभरातील औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठा अपघातात याची गणना होते. कारण घटनेनंतरच्या आठ-दहा दिवसांत अडिच हजारांच्या वर माणसे मृत्युमुखी पडली. गेल्या 30 वर्षांत किती माणसे अपंग झाली अथवा जिवास मुकली त्याची गणनाच नाही.
अब्दुल जब्बार यांनी पीडितांच्या न्याय हक्कासाठी भोपाळ गॅस पीडित उद्योग संघटना स्थापन केली. ही संघटना औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनेतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने अब्दुल जब्बार यांच्या होणाऱ्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा केली होती. ही मदत जब्बार यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
भोपाळ वायुगळती दुर्घटना -
मिक वायूचा वापर करुन सेविन हे कीटकनाशक त्या कारखान्यात तयार करण्यात येत होते. अपघाताच्या पूर्वी दीड महिना अगोदरपासून सेविनचे उत्पादन बंद करण्यात आले होते. मात्र, उरलेला 50 टनांपेक्षा अधिक वायू 2 टाक्यांमध्येच पडून होता. त्या टाकीत पाणी गेल्याने आतील मिक वायूचा दाब तीन किलोग्राम एवढा वाढला. परिणामी टाकीचे तापमान वाढल्याने तिच्यावरची सेफ्टी व्हाल्व्ह उघडली गेली आणि वायू बाहेर सुटला. यात अपरिमित मनुष्य व वित्त हानी झाली. त्यावेळी अपंग झालेले भोपाळमधील लोक आजही त्याचे परिणाम भोगत आहेत. कितीजणांना नुकसान भरपाई मिळाली ते माहीत नाही. कारखाना बंद पडल्याने लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
Bhopal gas tragedy: पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2019 11:32 AM (IST)
गेल्या 35 वर्षांपासून भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांच्या न्यायासाठी लढणारे अब्दुल जब्बार यांचे गुरुवारी खासगी रुग्णालयात निधन झालं. मध्य प्रदेश सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -