नवी दिल्ली : देशात आज (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. परंतु, यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन झालं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहे. पुण्यातून कुस्तीपटू राहुल आवारे देखील या सोहळ्याला उपस्थित होता.
विविध विभागांमध्ये एकूण 74 जणांचा सन्मान करण्यात आला आहे. ज्यापैकी 64 जण सोहळ्याला उपस्थित होते. जे मानकरी वैयक्तिकरित्या सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाहीत, ते एकतर कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा विलगीकरणात आहेत. काही खेळाडू देशाबाहेर असल्याने ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.
IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!
आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंदही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपापल्या शहराच्या स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरमधून हजर होते. याशिवाय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि काही प्रमुख पाहुणे विज्ञान भवनातून या कार्यक्रमाला उपस्थिती होते.
पाच खेळाडू खेलरत्न तर 27 खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी
यंदा पाच खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 27 जणांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मान होणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्माचाही समावेश आहे. याशिवाय पैलवान विनेश फोगाट, टेबिल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅराऑलिम्पियन मरियाप्पन थांगावेलु यांची खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येईल.
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव विभाग) : धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (अॅथलेटिक्स), शिव सिंह (बॉक्सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्ण कुमार हुड्डा (कबड्डी), विजय भालचंद्र मुनिश्वर (पॅरा लिफ्टर), नरेश कुमार (टेनिस), ओमप्रकाश दहिया (कुस्ती)
द्रोणाचार्य पुरस्कार (सर्वसामान्य विभाग) : जूड फेलिक्स (हॉकी), योगेश मालवीय, (मल्लखांब), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप कुमार हंडू (वुशु), गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन)
अर्जुन पुरस्कार : अतानु दास (तिरंदाजी), दुती चंद (अॅथलेटिक्स), सात्विकसाईराज रेंकीरेड्डी, चिराग शेट्टी, (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक, लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग) इशांत शर्मा, दिप्ती शर्मा (क्रिकेट), अजय अनंत सावंत (घोडेस्वारी), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिती अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंह, दीपिका (हॉकी), दीपक (कबड्डी) सरिका सुधाकर काळे (खो-खो), दत्तू बबन भोकानल (रोईंग), मनु भाकर, सौरभ चौधरी (नेमबाजी), मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस) दिविज शरण (टेनिस), शिवा केशवन (लूस), दिव्या काकरान, राहुल आवारे (कुस्ती), सुयश नारायण जाधव (पॅरा जलतरणपटू), संदीप (पॅरा अॅथलीट), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी)