नवी दिल्ली : देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारत सरकारने सर्वप्रथम 2003 साली 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. देशातील महिलांच्या गर्भावस्था, प्रसुती आणि त्यानंतरची आरोग्याची स्थिती चांगली राखणे तसेच बालकांना जन्म देताना मातेच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कार्य करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने 11 एप्रिलची निवड केली आहे.


भारतात महिलांच्या, त्यातल्या त्यात गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे.  भारताची आकडेवारी पाहता, जगात एकूण माता मृत्यू होतात त्यापैकी 12 टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. दरवर्षी 45 हजार मातांचा आपल्या बालकांना जन्म देताना मृत्यू होतो. दर एक लाख लोकसंख्येपैकी 167 मातांना आपला प्राण गमवावा लागतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, तुलनेने भारतातील माता मृत्यू दर हा झपाट्याने कमी होत आहे. 


कोरोनाच्या परिस्थितीमुळे जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती आहे. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. 


भारत सरकारने 1800 संघटनांचा एक गट असलेल्या व्हाईट रिबन अलाएन्स इंडियाच्या विनंतीनुसार 2003 सालापासून कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा दिवस साजरा करणारा भारत हा पहिला देश आहे. आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं,. पण कोरोनामुळे या वर्षी कार्यक्रम साजरे करण्यावर बंधनं आहेत. 


महत्वाच्या बातम्या :