मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना काळजीत टाकलं आहे. राज्य सरकारही कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी मनोरंजनसृष्टीचाही सहानूभूतीपूर्वक विचार केला. त्याची दखल घेऊन आता इंडियन फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल अर्थात आयएफटीपीसी यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 


कोरोनाचा फैलाव होऊ लागला की त्याला नेहमी टीव्हीवर चालणाऱ्या मालिकांचे सेट बळी पडतात. कारण, टीव्हीच्या सेटवर त्या परिसरातल्या अनेक ठिकाणाहून मंडळी कामासाठी येतात. वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून मंडळी इथे कामासाठी येतात. यात सुप्रसिद्ध कलाकार तर असतातच. शिवाय, यात तंत्रज्ञांचाही समावेश असतो. एका सेटवर साधारण 50 ते 75 लोक काम करत असतात. ही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कुणाला कुठून होईल हे सांगता येत नसतं. 


आता या गोष्टीची दखल घेऊन आयएफटीपीसीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सध्या चालू असलेल्या सर्व मालिकांच्या सेटवरच्या मंडळींना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. ही टेस्ट दर पंधरा दिवसांनी करण्याचा निर्णय या संघटनेनं घेतला आहे. गरज पडली वा सरकारने मागणी केली तर दर आठवड्याला अॅन्टिजेन टेस्ट करण्याची तयारीही कौन्सिलने दर्शवली आहे. हा निर्णय कौन्सिलने सर्व मालिकांच्या निर्मात्यांना कळवला आहे. सर्वच निर्मात्यांनी याला दुजोरा दिला आहे. या कौन्सिलचे अध्यक्ष जेआर मजेठिया यांनी ही माहीती दिली आहे. लॉकडाऊन लागला तरी चित्रिकरण चालू राहावं आणि कोरोनाला रोखता यावं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितल आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार अमोल कोल्हे आणि आदेश बांदेकर यांचेही कौन्सिलने विशेष आभार मानले आहेत. 


कौन्सिलच्या या निर्णयाचं स्वागत देशात चालू असलेल्या सर्वच मालिका निर्मात्यांनी केलं आहे. आज भारतात 90 मालिका चालू आहेत. तर 9 हजार मंडळी या सेटवर कार्यरत आहेत. त्या सर्वांची टेस्ट आता करावी लागणार आहे. सेटवर ही टेस्ट झाली की त्याचा अहवाल निर्मात्यांना कौन्सिलकडे पाठवावा लागणार आहे. त्यालाही सर्वांनी एकमताने मंजुरी दिली आहे.


मजेठिया याबद्दल बोलताना म्हणाले की,  "आम्ही काळजी घेत आहोतच. या पद्धतीमुळे लॉकडाऊन लागला तरी त्यातून टीव्ही इंडस्ट्रीला सवलत मिळेल जेणेकरून लोकरंजनाचं काम आम्हाला करता येतील. सर्व निर्मात्यांनी सेटवरच्या सर्व लोकांचे रिपोर्ट आमच्याकडे पाठवलेले आहेतच. पण आता दर पंधरा दिवसांनी हे रिपोर्ट येतील जे आम्ही सरकारकडे देऊ."


महत्वाच्या बातम्या :