नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा गुंता अद्याप सुटलेला नाही. सुनंदा यांच्या संशयास्पद मृत्यूशी निगडीत काही कागदपत्रं समोर आली आहेत.


दिल्ली पोलिसांकडे असलेल्या जुन्या कागदपत्रांवरुन वादाला नव्याने तोंड फुटलं आहे. सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, हे गूढ इतरांसाठी अद्याप उलगडलेलं नाही. मात्र सुनंदा यांची हत्या झाल्याचं त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळातच समोर आलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक आणि गुप्त तपास अहवालात ही बाब नोंदवण्यात आली होती. तत्कालीन डीसीपी बीएस जयस्वाल यांनी हा अहवाल तयार केला होता. 'हॉटेल लीलामधील घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर सुनंदा यांनी आत्महत्या केली नाही, हे स्पष्ट आहे. प्राथमिक ऑटोप्सी रिपोर्टनुसार सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला' असं एसडीएम आलोक शर्मांनी अहवालात लिहिलं आहे.

विषाचं नाव आहे अल्प्राजोलम पॉईझन. शरीरावरील जखमा मृत्यूच्या 12 तास ते चार दिवस आधीच्या आहेत. शरीरावर दाताच्या चाव्याचे ताजे निशाण होते. सुनंदा यांच्या शरीरावर झटापट झाल्याच्याही खुणा होत्या. शशी थरुर आणि सुनंदा यांच्यामध्ये झालेल्या मारामारीच्या खुणा असल्याचा दावा त्यांचा नोकर नारायणने केला होता.

सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती, मात्र कित्येक महिने उलटूनही पोलिसांनी केस नोंदवली नाही, असं पोस्टमार्टम, केमिकल, बायोलॉजिकल आणि फिंगरप्रिंट्स रिपोर्ट्स संकलित केलेल्या गुप्त अहवालात म्हटलं आहे.

या रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास हत्येचं प्रकार असल्याचं सुरुवातीलाच समोर येऊनही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं न जाणं आश्चर्यकारक आहे. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.

सुनंदा पु्ष्कर 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.