कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यामधील रोड शोदरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकांचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.


बॅनर्जी यांनी मोदींवर व्यक्तीगत पातळीवर टीका केली आहे. त्यांनी मोदींना सवाल केला आहे की, तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार?


निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणुकांचा प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, रोड शोदरम्यान हिंसाचार घडवून आणण्यासाठी भाजपवाल्यांनी बाहेरुन गुंड आणले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर जसा हिंसाचार झाला होता, तसाच हिंसाचार काल (मंगळवारी)झाला.

दरम्यान अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील पराभव दिसत असल्यानेच ममता बॅनर्जींनी हिंसाचार घडवला असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.


कोलकातामध्ये तुफान राडा
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये काल (मंगळवार 14 मे) तुफान राडा झाला होता. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. यानंतर रोड शो आवरता घेत अमित शाह यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.

भाजपच्या रोड शो दरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तीन वेळा हल्ला केला, भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला. 'तृणमूलला पराभव समोर दिसत असल्याने भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. मात्र भाजप संपूर्ण देशभरात 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांचे दिवस संपणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप 23 पेक्षा अधिक जागा जिंकणार' असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.

ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा भाजपने नाही, तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे. हिंसा झाली त्यावेळी विद्यासागर कॉलेजचं गेट बंद होतं, मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड कुणी केली? कॉलेजच्या आत कोण गेलं? कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, असं अमित शाहांनी सांगितलं.

संबंधित बातम्या