पश्चिम बंगालमधील प्रचारतोफा उद्या रात्री दहा वाजताच थंडावणार आहेत. येत्या रविवारी, म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे शुक्रवार 17 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रचार थांबणं अपेक्षित होतं. मात्र पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रचाराचा कालावधी वीस तासांनी घटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
पश्चिम बंगालमधील डम डम, बारासात, बसिरात, जयनगर, मथुरापूर, जादवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण कोलकाता आणि उत्तर कोलकाता या नऊ लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या (गुरुवारी) रात्री दहा वाजेपर्यंतच प्रचाराची परवानगी आहे.
VIDEO | कोलकात्यातील हिंसाचारामागील गुंड नक्की कोणाचे? | एबीपी माझा
पश्चिम बंगालचे गृहसचिव अत्री भट्टाचार्य यांना निवडणूक आयोगाने पदावरुन तात्काळ हटवलं आहे. त्यांचा कार्यभार राज्याच्या मुख्य सचिवांकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवण्यात आला आहे.
कोलकातामध्ये तुफान राडा
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये काल (मंगळवार 14 मे) तुफान राडा झाला होता. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. यानंतर रोड शो आवरता घेत अमित शाह यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.
भाजपच्या रोड शो दरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तीन वेळा हल्ला केला, भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला. 'तृणमूलला पराभव समोर दिसत असल्याने भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. मात्र भाजप संपूर्ण देशभरात 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांचे दिवस संपणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप 23 पेक्षा अधिक जागा जिंकणार' असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा भाजपने नाही, तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे. हिंसा झाली त्यावेळी विद्यासागर कॉलेजचं गेट बंद होतं, मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड कुणी केली? कॉलेजच्या आत कोण गेलं? कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, असं अमित शाहांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
- शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? : ममता बॅनर्जी
- ममता बॅनर्जींना निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने हल्ला घडवला, अमित शाहांचा पलटवार
- अमित शाहांच्या कोलकात्यातील रोड शोमध्ये तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांचा राडा
- ममता बॅनर्जींचा 'तो' फोटो शेअर करणाऱ्या तरुणीची सुप्रीम कोर्टाकडून सुटका, प. बंगाल सरकारला दणका