अहमदाबाद : नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (आज)संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. परंतु मोदींच्या शपथविधीचे त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही आमंत्रण नव्हते. त्यामुळे मोदींच्या आई हिराबेन आणि इतर कुटुबीयांना मोदींचा शपथविधी घरी टीव्हीवरच पाहावा लागला.

मोदी शपथ घेत असताना त्यांच्या आई खूप खूश होत्या. मोदींनी शपथ घ्यायला सुरु केल्यानंतर हिराबेन यांनी घरात टाळ्या वाजवून आपल्या मुलाचे कौतुक केले. निवडणूक जिंकल्यानंतरही अहमदाबाद येथे जाऊन मोदींनी आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले होते.

मोदी यांच्या बहीण वसंतीबेन म्हणाल्या की, "नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे घरातील कोणत्याही सदस्याला आमंत्रण देण्यात आले नाही. 2014 मध्ये पहिल्यांदा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तेव्हासुद्धा कुटुंबातील एकाही व्यक्तीला शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले नव्हते."

दरम्यान, मैं नरेंद्र दामोदरदास मोदी....असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि राष्ट्रपती भवनाच्या साक्षीने मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा शुभारंभ झाला. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. आता मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तसेच आज झालेल्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

मोदींच्या शपथविधीला बॉलिवूडकरांचीही उपस्थिती होती. अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री कंगना रणौत, निर्माता दिग्दर्शक करण जोहर, अभिनेते अनुपम खेर यांच्यासह उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानीदेखील उपस्थित होत्या.