नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात 58 मंत्र्यांचा शपथविधी
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2019 09:16 PM (IST)
महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली : मैं नरेंद्र दामोदरदास मोदी....असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि राष्ट्रपती भवनाच्या साक्षीने मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्तापर्वाचा शुभारंभ झाला. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन यांच्यासह 58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते. 43 वर्षीय स्मृती इराणी या मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले 72 वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत. शरद पवारांनी अवमानामुळे अनुपस्थिती टाळली शरद पवार शपथविधी सोहळ्याला हजेरी न लावताच मुंबईला परतले आहेत. पवारांना पाचव्या रांगेतील पास देण्यात आला होता, याकडे लक्ष वेधूनही पास बदलून देण्यात आला नाही. आपल्या ज्येष्ठतेचा अनादर झाल्याची भावना पवारांच्या मनात असल्याचं म्हटलं जातं. हिराबेन टीव्हीवरुन साक्षीदार विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन टीव्हीवरुन हा शपथविधी पाहत असल्याचे फोटो अल्पावधीतच सोशल मीडियावर वायरल झाले. मुलाला आशीर्वाद देण्यासाठी हिराबा राजधानीत उपस्थित राहू शकत नसल्या, तरी त्यांनी टीव्हीवरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या. #मराठीतशपथ हवेतच मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांनी सोशल मीडियावरुन उचलून धरली होती. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मराठीतून शपथ घेण्याचं कबूलही केलं, मात्र सावंत, दानवे, गडकरी, आठवले यांनी हिंदीतूनच शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेणारे चेहरे
मोदी मंत्रिमंडळात स्थान नसलेले चेहरे अरुण जेटली सुषमा स्वराज सुरेश प्रभू एम जे अकबर मेनका गांधी मनोज सिन्हा सुभाष भामरे हंसराज अहिर महेश शर्मा जे पी नड्डा राज्यवर्धनसिंह राठोड