नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपाध्यक्ष अमित शाहांचाही समावेश असेल, अशी माहिती गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी केली आहे. जीतू वाघानी यांनी ट्विट करुनही अमित शाहांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छाही दिल्या आहेत.


भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी यावर्षी गुजरातच्या गांधीनगरमधूल लोकसभा निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने अमित शाह यांना निवडणुकीत विजयही मिळाला. त्यानंतर आता शाहांना केंद्रात एखादे मोठे मंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.



अमित शाह यांना केंद्रात मंत्रीपद नको आहे, त्यांना भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहायचे असल्याचंही बोललं जात होतं. मात्र आता अमित शाहांचेच निकटवर्तीय जीतू वाघानी यांच्या माहितीमुळे शाहांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून देण्यात शाह यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे शाह यांना मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रीपद मिळेल, अशी शक्यता आहे.


नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज राष्ट्रपती भवनात होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात मोठा शामीयाना उभारण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात हा शपथविधी होणार असल्यानं तिथं जय्यत तयारी करण्यात आली. या सोहळ्यासाठी बिमस्टेक देशांसह अन्य 8 राष्ट्रांचे प्रमुख हजर राहणार आहेत. या प्रमुख अतिथींसह 6 हजार खास पाहुणेही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आणि पश्चिम बंगालमधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना या सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं आहे.