Nagaland New Chief Minister:  नागालँडबाबत सरकारचे सूत्र निश्चित झाले असून निफियु रिओ हे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.  एनडीपीपी (NDPP) अध्यक्ष  निफियु रिओ (Neiphiu Rio) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सरकार स्थापनेसंदर्भात बैठक झाली.  या बैठकीसाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदासाठी  नेफियू रिओ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संध्याकाळी देण्यात आली, तर नागालँडचे उपमुख्यमंत्रीपद पूर्वीप्रमाणेच भाजपकडे असणार आहे.


शनिवारी  देखील एनडीपीपीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठकही बोलावण्यात आली होती. नेफियु रिओ यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली. 7 मार्च रोजी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी नेफियू रिओ यांनी शनिवारीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या रियो यांनी राजभवनात राज्यपाल  गणेशन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी ट्विट केले की, माझा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे मी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  राज्यपाल एल.ए. गणेशन यांच्याकडे दिला आहे.


पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नेफ्यू रियो


मंगळवारी  मुख्यमंत्र्यांच शपथविधी होणार आहे. नेफ्यू रियो मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजपने विधानसभेच्या 60 जागांसाठी एकत्र निवडणूक लढवली होती. एनडीपीपीचे 60 तर भाजपचे 20 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.  त्यापैकी एनडीपीपीचे 25 तर भाजपचे 12 उमेदवार निवडुन आले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता होती. या अगोदर 2018 साली देखील  40:20 या फॉर्म्युलावर भाजप आणि एनडीपीपीने निवडणूक लढवली होती. त्यावेळी एनडीपीपीने 18 आणि भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या.


तीन राज्यांचा शपथविधी सोहळा


नागालँड आणि मेघालयाचा शपथविधी सोहळा मंगळवारी (7 मार्च) तर त्रिपुराचा शपथविधी सोहळा बुधवारी (8 मार्च) ला पार पडणार आहे. मेघालयाचा शपथविधी सोहळा 11 वाजता तर नागालँडचा शपथविधी सोहळा 1 वाजून 45 मिनिटानी पार पडणार आहे. तर त्रिपुराचा शपथविधी सोहळा बुधवारी 11 वाजता पार पडणार आहे. तिन्ही राज्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.