Odisha Minister Naba Das Death : ओडिशाचे (Odisha) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री (Odisha health and family welfare minister) आणि  बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास (Biju Janata Dal (BJD) leader Naba Das) यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार  केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या  एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते.  दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु होते.
 
60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दासने त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले होते की, नबा दास यांच्या छातीवर डाव्या बाजूला गोळ्या लागल्या. एएसआयच्या रिव्हॉल्व्हरमधून काही गोळ्या लागल्याने शेजारी असलेला एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. 


मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्यक्त केलं दुःख


ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंत्री नाबा दास यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले आहे. नवीन पटनायक यांनी म्हटलं आहे की, नबा दास हे सरकार आणि पक्षासाठी खूप महत्वाचे होते. त्यांच्या निधनाने ओडिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 






कोण होते नबा किशोर दास 


नब किशोर दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक केली.


सध्या ते बिजू जनता दलमध्ये होते. ते नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते.