मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली आपली मुंबई आता मागे पडली आहे. कारण 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने केलेल्या सर्व्हेत दिल्लीने आगेकूच केली आहे.
'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने जगातील 50 आर्थिक महानगरांचा सर्व्हे केला. यामध्ये राजधानी दिल्ली 30 तर मुंबई 31 व्या क्रमाकांवर राहिली.
सर्व्हेनुसार, दिल्ली म्हणजे NCR मध्ये गुडगांव, नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबादसारखी शहरं मिळून, दिल्ली-एनसीआरचा (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) जीडीपी 370 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 54 हजार कोटी रुपये आहे.
तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या शहरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, भिवंडी आणि पनवेल यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्र अर्थात MMR मधील या शहरांचा एकत्रित जीडीपी 368 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 2 लाख 52 हजार कोटी रुपये इतका आहे.
असं असलं तरी मुंबईची लोकसंख्या ही दिल्ली एनसीआरच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे तसं पाहिल्यास दरडोई उत्पन्नामध्ये मुंबई दिल्लीपेक्षा पुढे आहे.
मुंबईकरांचं दरडोई वार्षिक उत्पन्न सरासरी 16881 डॉलर, म्हणजेच 11 लाख 60 हजार रुपये आहे. तर दिल्लीचं दरडोई वार्षिक उत्पन्न सरासरी 10 लाख 80 हजार आहे.
सर्व्हेनुसार, 2030 मध्ये मुंबई आणि दिल्ली या शहरांचा जगातील बड्या आर्थिक केंद्रांमध्ये समावेश असेल. 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'च्या मते 2030 मध्ये दिल्ली 11 व्या तर मुंबई 14 व्या क्रमांकावर असेल.
दरम्यान, 'ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स'ने हा दावा केला असला तरी, मुंबई केवळ जीडीपीमुळे देशाची आर्थिक राजधानी ठरत नाही. मुंबईत रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय, मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचं मुख्यालय, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, अनेक देशांची व्यापारी वकिलाती मुंबईत आहेत. याशिवाय हिरे आणि सोनेबाजाराचं केंद्र म्हणून मुंबईची ओळख आहे. त्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.