अहमदाबाद : महाराष्ट्रानंतर भाजपने गुजरातमध्ये झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. 125 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 109 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे केवळ 16 उमेदवार निवडून आले आहेत.


गुजरातमध्ये 32 जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजपचा आलेख मागच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगलाच उंचावला आहे. तर काँग्रेसची मोठी घसरण झाली आहे.

पूर्वीच्या निवडणुकीत भाजपचे 64 तर काँग्रेसचे 52 उमेदवार निवडून आले होते. सूरत जिल्ह्यातील कनकपूर-कंसाड नगरपालिकेत भाजपने 28 पैकी 27 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं.

दरम्यान या निवडणुकीत भाजपला नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा तोटा होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र गुजरातच्या जनतेने पंतप्रधान मोदींच्या बाजूनेच कौल दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.