अहमदाबाद : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशानेच धमकीचं पत्र ठेवलं होतं. एअरहोस्टेसवरील प्रेमापोटी त्याने हे कृत्य केला. पण धमकीचं पत्र ठेवणाऱ्या बिरजू किशोर सल्ला याला थट्टा अतिशय महागात पडणार आहे.


दर आठवड्यात विमानाने प्रवास करणारा बिरजू सल्ला हा मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलरचा मुलगा आहे.

बिरजूच्या या मस्करीमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाही सतर्क झाली होती. या विमानाचं अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. अखेर चौकशीमध्ये हे कृत्य का केलं, याची कबुली प्रवाशाने दिली.

एअरहोस्टेसवर प्रेम आणि कंपनीशी वैर
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या बिरजू सल्लानेच धमकीचं पत्र विमानात ठेवलं होतं. आरोपांची कबुली देताना त्याने सांगितलं की, "विमानाच्या एअरहोस्टेसवरील प्रेम आणि जेट एअरवेजशी असलेलं जुनं वैर या कारणांमुळे धमकीचं पत्र ठेवलं.

एनआयए लवकरच या प्रकरणाचा तपास करणार आहे. बिरजूने ज्या कम्प्युटरमध्ये हे पत्र लिहिलं आणि ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे त्याचा उर्दूमध्ये अनुवाद केला, तो जप्त करण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना झालं आहे.

एअरहोस्टेसने बिरजूला ओळखलं
बिझनेस क्लासमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या बिरजूच्या हालचालींवर एअरहोस्टेसची नजर होती. धमकीचं पत्र मिळण्याच्या काही वेळ बिरजू बिझनेस क्लासच्या टॉयलेटमध्ये गेला होता. यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजवरुन त्याला दुजोराही मिळाला. अहमदाबाद क्राईम ब्रान्चमधील एका अधिकारीच्या माहितीनुसार, बिरजूने गुन्ह्याची कबुली लेखी स्वरुपात दिली आहे.

विमानात धमकीचं पत्र
बोईंग 737-900 विमानाने सोमवारी पहाटे 3 वाजता 115 प्रवाशांसह मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. यानंतर विमानाच्या क्रू मेंबरला एक पत्र सापडलं. "विमान थेट पाकव्याप्त काश्मीरला घेऊन जा. विमानात आता 12 अपहरणकर्ते आहेत. जर विमान दिल्लीत उतरवलं तर त्याच्या कार्गोमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होईल," अशी धमकी या पत्रात दिली होती.

यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ माजली आणि 5 वाजून 30 मिनिटांनी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यानंतर मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली विमानतळवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र ही धमकी केवळ अफवा असल्याचं तपासात स्पष्ट झालं.

कोण आहे बिरजू  सल्ला?
37 वर्षीय बिरजू सल्ला याचे वडील एस किशोर कुमार हे मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर आहे. बिरजू मरीन ड्राईव्हमधील सुमारे 45 मजली इमारतीत आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. विमानाच्या एअरहोस्टेसवरील प्रेम आणि जेट एअरवेजसोबतची जुनी खुन्नस काढण्यासाठी त्याने ही थट्टा केली.

या पत्रामुळे एअरलाईन्सला नुकसान होईल आणि एअरहोस्टेस नोकरीसाठी आपल्याकडे येईल, असं बिरजूला वाटत होतं. मात्र आता हा आरोपी अहमदाबाद सीआयडीच्या ताब्यात आहे. त्याला आता 'नो फ्लाईट' यादीत टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला आता ट्रेनने प्रवास करावा लागणार आहे.