मुंबई : युक्रेन-रशियामधील युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडाला आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या-आमच्या खिशाला सोसावा लागू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार असल्याने त्याचा परिणाम इतर गृहोपयोगी वस्तू आणि वाहतूक क्षेत्रावर पडणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढणार आणि त्याचा फटका वस्तू बाजाराला बसणार आहे. 


कोणकोणत्या वस्तूंवर परिणाम होणार? 


- सूर्यफूल तेलाच्या आयातीला मोठा फटका बसणार असल्याने किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.


- इतर सर्व खाद्य तेलाच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम होणार आहे 


- पाम तेलाच्या किंमतीत 2022 सालात 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे 


- कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने सोने आणि चांदीत मोठी गुंतवणूक होतेय, त्यामुळे त्याचे भाव वधारले आहेत 


- दुसरीकडे कॉपर, झिंक, निकेल, ॲल्युमिनियमसारख्या कमॉडिटीजची मोठी आयात युक्रेन, रशियातून होते. अशातच त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे 
झिंक, निकेल, ॲल्युमिनियम आणि कॉपरच्या किंमतीत उच्चांकी वाढ दिसतेय 


- पोटॅश आणि फॉस्फेटसारख्या खतांच्या किंमती वाढल्या आहेत, त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे 


जागतिक बाजारपेठात गहू, मका, सोयाबीन आणि तीळाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका देखील देशातील नागरिकांना बसू शकतो. दुसरीकडे, शेतकऱ्यांना सोयाबीन दरवाढीचा फायदा झाला असला तरी सामान्यांना यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.


खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याने त्याचा फटका थेट तुमच्या जेवणाच्या ताटावर होईल. दुसरीकडे, स्टील, ॲल्युमिनियमसारख्या वस्तूंमध्ये वाढ झाल्याने गृहनिर्माणाच्या खर्चासोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या किंमतींमध्ये देखील वाढ होईल. आयात-निर्यात थांबल्याने पुरवठ्यावर परिणाम होईल आणि त्याचा थेट परिणाम म्हणून महागाईत वाढ होणार आहे. 



2022 सालात कोणत्या वस्तूंमध्ये किती टक्के वाढ? 


 
कमॉडिटी                  वाढ किती 


खाद्य तेल                   35 टक्के 


सोने                          10 टक्के 


चांदी                          10 टक्के


निकेल                        131 टक्के 


ॲल्युमिनियम              33 टक्के 


झिंक                         16 टक्के 


कॉपर                        6 टक्के 


स्टील                          12 टक्के 


लीड                            7 टक्के 


जेव्हा जेव्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतात तेव्हा तेव्हा त्याचा थेट फटका जीवनावश्यक वस्तूंवर होत असतो. खाद्यतेलाचे भाव वाढतात, भाजीवाला, डाळी, गृहोपयोगी वस्तूंच्या किंमतींवर त्याचा परिणाम होतो. वाहतुकीवरचा खर्च वाढतो. परिणामी महागाईत वाढ होते आणि त्यात भरडला जातो तो सर्वसामान्य नागरिक.