Goa Election 2022: उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 10 मार्चला निकाल जाहीर होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच गोव्यात राजकीय खळबळ उडाली आहे. गोव्यात काँग्रेसमध्ये (congress) फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काँग्रेसने आपल्या उमेदवारांना इतर ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवारांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इतर काही पक्ष आपल्या नेत्यांना फोडून त्यांच्या पक्षात सामील करणार असल्याची भीती काँग्रेसला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांना कोल्हापूर किंवा राजस्थानमध्ये हलवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
2017 मध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करता आली नाही
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सर्वात मोठा पक्ष बनूनही काँग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करता आले नाही. म्हणून यावेळी काँग्रेस प्रत्यक पाऊल सांभाळून टाकत आहे. याच दरम्यान एक्झिट पोलमध्ये गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एक्झिट पोलच्या निकालात गोव्याची स्थिती काय?
(एबीपी न्यूज-सी व्होटरनुसार)
- एकूण जागा - 40
- भाजप- 13-17
- काँग्रेस - 12-16
- आप- 1-5
- टीएमसी - 5-9
- इतर- 0- 2
दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. या निवणुकीत काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत त्यावेळी आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर एमजीपी 3 आणि इतर पक्षांनी 7 जागा जिंकल्या होत्या.
संबंधित बातम्या :
Goa Exit Poll 2022 : गोवा बहुमतापासून दूर 'हा' पक्ष ठरणार किंगमेकर
Elections 2022 Voting : गोवा विधानसभेसाठी चुरशीने मतदान, उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्येही उत्साह