Mother Teresa Birth Anniversary:  एक थोर मानवतावादी समाजसेविका व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी मदर तेरेसा यांची आज जयंती.  मदर तेरेसा यांचे मूळ नाव ॲग्नेस गोंक्झा बोजाक्किऊ. त्यांचा जन्म युगोस्लाव्हियामध्ये झाला. निकोलस हे त्यांचे वडील आणि ड्रेनाफाईल बर्नाई या त्यांच्या आई. वयाच्या अठराव्या वर्षी, म्हणजे 1928 साली, सिस्टर होण्यासाठी ॲग्नेसने आपल्या आईचा आणि भावंडांचा निरोप घेतला आणि ‘सिस्टर्स ऑफ लॉरेटो’ या कॅथलिक सिस्टरांच्या संस्थेत प्रवेश घेतला. सिस्टर होण्यासाठी आपले घर सोडल्यानंतर तिची आपल्या आईशी कधीच भेट झाली नाही. शाळांत शिकविण्यासाठी ॲग्नेसचे 1929 झाली कोलकात्यात आगमन झाले.


कोलकात्यातील एन्टली या उपनगरातील लॉरेटो संस्थेच्या सेंट मेरीज स्कूल या मुलींच्या शाळेत सुरुवातीला शिक्षिका आणि नंतर प्राचार्य म्हणून सिस्टर तेरेसा यांनी वीस वर्षे काम केले. सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुली समाजाच्या वरच्या थरांतील कुटुंबांतील होत्या. दुर्बल घटकांतील उपेक्षित लोकांशी या काळात सिस्टरांचा फारसा संबंध नव्हता.


कोलकात्यात फिरताना रस्त्यावर भीक मागणारे महारोगी, रिक्षा ओढून पोट भरणारे कृश आणि क्षयरोगाची लागण झालेले रिक्षाचालक, फूटपाथवर अखेरच्या घटका मोजणारे आजारी वृद्ध यांची स्थिती पाहून सिस्टरना कळवळा येत असे. या पददलितांसाठी आपण काही करू शकत नाही या जाणिवेने त्या अस्वस्थ होत. कोलकात्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकांची सेवा करण्यासाठी लॉरेटो संस्था सोडून स्वत:ची नवी संस्था स्थापन केली पाहिजे, असे 1939 नंतर त्यांना तीव्रतेने वाटू लागले.


सिस्टर्सची वा धर्मगुरूंची नवीन संस्था सुरू करण्यासाठी कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांची परवानगी मिळणे आवश्यक होते. सुदैवाने रोममधून लेखी परवानगी मिळाली आणि समाजाने टाकून दिलेल्या उपेक्षित लोकांची व गरिबांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा लॉरेटो संस्थेतून 1948 साली बाहेर पडल्या. रस्त्यांवर, फूटपाथवर वा उकिरड्यापाशी पडलेल्या महारोग्यांची, आजाऱ्यांची वा अनाथ अर्भकांची सेवा करण्यासाठी सिस्टर तेरेसा यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पददलितांची काळजी घेण्यासाठी त्या शब्दश: रस्त्यावर आल्या.


लॉरेटो संस्थेच्या सिस्टर असताना तेरेसा सफेद पायघोळ झगा, डोक्यावरून कमरेपर्यंत पडणारा काळा गाऊन असा पोशाख करत असत. ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’   ही नवीन संस्था स्थापन  केली.


महान कार्यासाठी मदर तेरेसांना अनेक पुरस्कार


मदर तेरेसांच्या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना 1979 सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. याशिवाय त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी पद्मश्री पुरस्कार (1962), मॅगसेसे पुरस्कार (1962), पोपचे शांतता पारितोषिक (1971), नेहरू पुरस्कार (1972), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (1979), भारतरत्न (1980) यासह अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले. विविध मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी त्यांच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल त्यांना दिला. मदर तेरेसांचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड (1975) या पुस्तकात संकलित केले आहेत. गरजवंतांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसांना देशात कुठेही फिरता यावे यासाठी इंडियन एअर लाइन्स आणि रेल्वे मंत्रालयाने त्यांना प्रवासासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली होती.


मदर तेरेसांनी गर्भपातास नेहमीच विरोध केला. कुठल्याही कारणास्तव गर्भपात करून अर्भकाचा खून करणे हे पाप आहे, असे त्या मानत. जगात अनेक देशांनी गर्भपातास कायद्याने मान्यता दिली तरी त्यांनी आपले मत बदलले नाही. गर्भपाताविषयीची मदरची मते अनेकांना पटली नाहीत तरी आयुष्यभर या मताचा त्या ठामपणे प्रचार करीत राहिल्या. कोलकात्यात म्हणजे आपल्या कर्मभूमीत मदर तेरेसांचे निधन झाले. मदर तेरेसांच्या निधनानंतर धर्मसभेच्या नियमानुसार त्यांना पोप फ्रान्सिस यांनी 4 सप्टेंबर 2016 रोजी ‘संत’ म्हणून घोषित केले.


(या बातमीची माहिती https://marathivishwakosh.org/48717/ वरुन घेण्यात आली आहे)