शिमला : 17 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नेपाळी मायलेकींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलान जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून 17 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार सुरु असल्याचा आरोप पीडिताच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी 45 वर्षीय महिला आणि तिच्या 22 वर्षीय मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलान जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिव कुमार यांनी ही माहिती दिली.
वेश्याव्यवसाय आणि संबंधित गुन्ह्यांसाठी अल्पवयीन व्यक्तींची खरेदी केल्याचा आरोपाखाली मायलेकींवर कलम 373 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
'मायलेकींनी माझ्या मुलाला आपल्या घरी नेलं आणि तीन महिने डांबून ठेवलं. या कालावधीत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले' असा आरोप पीडित तरुणाच्या वडिलांनी केला आहे. पीडित तरुण हा स्थानिक रहिवासी त्याचं शालेय शिक्षण झालेलं नाही.
दरम्यान, या प्रकारासाठी वयाची 17 वर्ष 6 महिने पूर्ण केलेल्या तरुणाची संमती असावी, असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे मायलेकींना 'पोक्सो' कायद्याअंतर्गत येणारी कलमं लावण्यात आलेली नाहीत. तपास सुरु असल्यामुळे दोघींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.