Voter’s List Registration : मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता 18 वर्ष पूर्ण होण्याची गरज नाही. कारण आता, 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार आहे. तसेच वर्षातून चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. गुरुवारी निवडणूक आयोगानं यासंर्भात माहिती दिली. 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव नोंदणी करु शकता. ही मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत
.
मतदार ओळखपत्र – आधार जोडणीमतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाची माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत.