Adhir Ranjan Chowdhury : देशाच्या राष्ट्रपतींची निवड होऊन एक आठवडाही झालेला नाहीय, तोच राष्ट्रपतींवर एक टिपण्णी करुन काँगेसच्या अधीर रंजन चौधरी यांनी एक वाद ओढवून घेतलाय. या सगळ्यावरुन संसदेच्या बाहेर, संसदेतही बरंच नाट्य घडलं.  


काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला..आणि त्यावरुन सत्ताधारी भाजपनं आज संपूर्ण सभागृह दणाणून सोडलं. वातावरण इतकं पेटलं की थेट सोनिया गांधींच्याच माफीची मागणी भाजपनं केली. स्मृती इराणी म्हणजे भाजपच्या गांधी कुटुंबाविरोधातल्या शस्त्रच. आज त्यांनीच थेट गांधींवर हल्लाबोल केला. संसदेत त्यानंतरही बरंच नाट्य घडलं. पण त्याआधी समजून घेऊ हा सगळा वाद सुरु कुठून झाला. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका मुलाखतीवरुन वादाला सुरुवात झाली. संसदेच्या बाहेर एबीपी न्यूजशी बोलत असताना त्यांनी राष्ट्रपतींसाठी हा शब्दप्रयोग वापरला. त्यानंतरच वादाला सुरुवात झाली.  या मुद्द्यावरुन संसदेत गदारोळ झाल्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं.  त्यानंतरही एक नाट्य घडलं. सोनिया गांधी यांनी एक अनोखं पाऊल उचललं आणि जे भाजप खासदार निदर्शनं करत होतं, त्यांच्या बाजूला त्या गेल्या. आणि तिथे रमा देवी यांना त्यांनी विचारलं की, माझं नाव यात का ओढलं जातंय? शेजारीच स्मृती इराणीही होत्या. त्यांनी त्यात बोलायचा प्रयत्न केला. त्यावर सोनिया गांधींनी डोन्ट टॉक टू मी असं म्हटल्याचा भाजपचा दावा आहे. 






संसदेत गेल्या आठवडाभरापासून महागाई, बेरोजगारीवरुन विरोधक निदर्शनं करतायत. त्याला सत्ताधाऱ्यांनी दाद दिली नाही. पण आज अधीर रंजन चौधरी यांनी आयती संधी उपलब्ध करुन दिल्यानंतर सत्ताधारी विरोधकांवरच आक्रमक झाले. आज सकाळपासूनच त्याची झलक पाहायला मिळत होती. भाजपच्या एससी, एसटी वर्गातल्या खासदारांनाही या मुद्द्यावरुन आक्रमक राहण्याचे आदेश दिले गेले होते. सभागृहात जातानाच माफीच्या मागणीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना छेडलं असतं त्यांनी यावर अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं म्हटलं होतं. 
 
अधीर रंजन चौधरी यांनी याआधीही अनेक वाद ओढवून घेतले आहेत. आता तर कारण नसताना सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरुन आयतं कोलीत हातात मिळालं. खरंतर राष्ट्रपती, राष्ट्रपत्नी असा अतार्किक संबंध जोडून शब्दच्छ करायची काही गरज नव्हती. राष्ट्रपती, सभापती, कुलपती असे शब्द वापरताना त्यातला पती हा अधिपती याच अर्थानं अपेक्षित असतो. पण अशी टीपण्णी करुन अधीर रंजन चौधरी यांनी सेल्फ गोल केला. एकीकडे आदिवासी महिलेला राष्ट्रपती भवनात पोहचवलं हा भाजपचा प्रचार सुरु असतानाच आता या समाजाचा अपमान काँग्रेसनं केला अशीही टीका सुरु झाली.