मुंबई : आज चैत्र पौर्णिमा... आज जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पाहाल, तेव्हा एक गोष्ट तुमच्या ध्यानात येईल.. की नेहमीच्या पौर्णिमेला दिसतो तसा आजचा चंद्र भलामोठ्ठा टप्पोरा नाही. तर आजचा चंद्र एरवीच्या पौर्णिमेपेक्षा तुलनेने लहान आहे.
आजचा चंद्र लहान आहे, त्यामध्ये चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंतीचा काहीही संबंध नाही. तर हा एक खगोलीय चमत्कार आहे. असा प्रकार साधारणपणे पंधरा वर्षातून एकदाच होतो. या चमत्काराला लघुचंद्र किंवा इंग्रजीवाले मिनी मून म्हणतात. एरवीच्या पौर्णिमेला ते फुल मून म्हणतात.
चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. मात्र काल परवा आणि आज या पौर्णिमेच्या आधीच्या आणि नंतरच्या दिवसात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर हे जवळपास 4 लाख 6 हजार 350 किमीपर्यंत वाढलं आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेमुळे हा बदल होत असतो. म्हणजे आताच्या चैती पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून सर्वात लांब आहे. म्हणून तो आपल्याला तुलनेने लहान दिसत आहे.
तसंही आपल्याकडील हौशी आकाश निरीक्षकांना खऱ्या अर्थाने मिनी मून पाहता येणार नाही कारण चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक दूरच्या कक्षेत असण्याची वेळ आज सकाळी 10.55 च्या सुमारास होती. मात्र चंद्र पृथ्वीपासून लांबच्या कक्षेत असल्यामुळे आज रात्रीही तुलनेने चंद्र लहानच दिसेल.
यानंतर असा खगोलीय चमत्कार 10 डिसेंबर 2030 रोजी होईल.
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, तेव्हा त्या स्थितीला सुपरमून म्हणतात. सुपरमून आणि मिनी मून या चंद्राच्या दोन स्थितीतील फरक हा साधारणपणे 14 टक्क्यांपर्यत असतो.