नवी दिल्ली : मान्सूनने अंदमानात धडक दिली असून, तिथे पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनने दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यंदा मान्सून केरळमध्ये 6 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने तीन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. त्यानूसार मान्सूनची वाटचाल सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.


याआधी स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मान्सून भारतात येण्यासाठी उशिर होऊ शकतो. 6 जून रोजी मान्सून केरळच्या समुद्रकिनारी धडक देईल. मागील वर्षी 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता तर 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूनने केरळच्या किनाऱ्यावर वर्दी दिली होती.

महाराष्ट्रातही पाऊस उशिराने
दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो. परंतु यंदा मान्सूनचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या केरळमध्येच 6 जूनला आगमन होत असल्याने मान्सून महाराष्ट्रात आणखी उशिराने पोहोचेल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि बळीराजाला पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अल निनोचा प्रभाव कमी
भारतीय हवामान विभागाने आपल्या पहिल्या अंदाजात सामान्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. यंदा अल निनोचा जोर कमी असेल आणि तो हळूहळू कमी होईल. यंदा सामान्य म्हणजेच 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात 5 टक्के पाऊस कमी किंवा जास्त होऊ शकतो, असं आयएमडीने म्हटले होते.

यंदा किती पाऊस पडणार?
यंदा मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा अतिशय जास्त (110 टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाची शक्यता 2 टक्के आहे, तर सामान्यपेक्षा जास्त (104-110 टक्के) पावसाची शक्यता 10 टक्के आहे. याशिवाय सामान्य म्हणजेच 96-104 टक्के पावसाची शक्यता 39 टक्के आहे. म्हणजेच एकत्रित सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सामन्यपेक्षा थोडा कमी म्हणजेच 90-96 टक्के पावसाची शक्यता 32 टक्के आणि 90 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता 16 टक्के आहे. मान्सूनदरम्यान जर 90 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तर दुष्काळ जाहीर होतो.