नवी दिल्ली : देशात पुढचं सरकार कुणाचं येणार या प्रश्नाचं उत्तर अवघ्या पाच दिवसांत मिळणार आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल आहे. पण सरकारनिर्मितीच्या संभाव्य हालचालींना आत्तापासूनच वेग आला आहे. यूपीएच्या गोटातून नेमकी कशी रणनीती सुरु आहे, आणि कोण असू शकतात संभाव्य मोहरे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

निकालाच्या काही दिवस आधीपासूनच राजकीय भेटीगाठींचा सिलसिला जोरात सुरु आहे. कधी डीएमकेचे स्टॅलिन आणि टीआरएसचे केसीआर भेट घेतात. कधी चंद्राबाबू नायुडू दिल्लीत येऊन अरविंद केजरीवाल, शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटीगाठी करत आहेत. निवडणुकीत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत, तर इतर सर्व विरोधकांची एकजूट कायम असावी यासाठी या हालचाली आहेत.

विरोधकांनी तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, याचं उत्तर कधी दिलं नाही. याचा फैसला निवडणुकीनंतर होईल, असंच ते सांगत आले आहेत. भाजप बहुमतापासून दूर आणि काँग्रेसही शंभरीच्याच आसपास राहिली तर प्रादेशिक पक्षांचं महत्व जास्त वाढण्याची शक्यता आहे.

कमी जागा मिळाल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या रेसमधे न जाता एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यायचा विचार केला तर ज्या नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यांची काय स्थिती आहे?

VIDEO | काँग्रेसला 40 जागा मिळाल्यास पंतप्रधान मोदी फाशी घेणार का? | स्पेशल रिपोर्ट



आकड्यांच्या दृष्टीने पाहिलं, तर 30 च्या पुढे खासदार असलेल्या पक्षांना यात जास्त भाव मिळू शकतो. पश्चिम बंगालमध्ये 42 जागांपैकी मागच्या वेळी 34 जागा ममता बॅनर्जी यांनी जिंकल्या होत्या. या वेळीही ममतांनी जर असाच एकहाती बंगाल काबीज केला, तर त्यांचा दावा वाढू शकतो. उत्तर प्रदेशात मायावती-अखिलेश प्रत्येकी 37 जागांवर लढत आहेत. भाजपला हरवण्यात या महागठबंधनला यश आलंच तर मायावतीही या रेसमध्ये येऊ शकतात. उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपला रोखल्यास मायावतींचा दबदबाही वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी मोदी लाटेत एकही जागा मायावतींना मिळू शकली नव्हती. त्यामुळे या पराभवाचा वचपा त्या यावेळी काढतात का हे पाहावं लागेल.

नरेंद्र मोदींच्या विरोधात एक मोठी आघाडी दक्षिणेतही उभी राहत आहे. आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे केसीआर म्हणजेच के चंद्रशेखर राव. विशेष म्हणजे नायुडू हे मागच्या वेळी एनडीएचाच घटक होते. केसीआरही तसे काठावरचेच आहेत. आंध्रात 25 तर तेलंगणात 17 जागा आहेत लोकसभेच्या. त्यात यावेळी जगमोहन फॅक्टरही महत्त्वाचा असल्याने चंद्राबाबूंच्या पाठी किती खासदारांची ताकद उभी राहते, हे बघावं लागेल. केसीआर यांच्यासाठी भाजपपेक्षा काँग्रेस हाच पहिला शत्रू आहे. त्यामुळे अगदीच एनडीएला काही खासदारांची गरज पडली तर त्यांच्या मदतीला सर्वात पहिल्यांदा धावणाऱ्यांमध्ये केसीआर यांचं नाव असू शकतं. यूपीएच्या गोटात जायचं की एनडीएच्या, हे केसीआर केवळ आकडे पाहूनच ठरवतील अशी आत्ताची स्थिती आहे.

यूपीएच्या गोटात पंतप्रधानपदाची संधी आलीच, तर अनुभव आणि मित्रपक्षांशी चांगले संबंध या जोरावर शरद पवार यांचेही स्टेक्स पणाला असतील. पण त्यासाठी राष्ट्रवादीचा आकडा किमान डबल डिजीटमध्ये जाणार का पहिला प्रश्न असेल. मोदींच्या सर्व विरोधकांना एकाच बाजूला आणण्याची ताकद पवारांमध्ये आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात ते महत्वाची भूमिका बजावतील यात शंका नाही. सवाल हाच आहे की या रोलचा मोबदला म्हणून खासदार कमी असतानाही त्यांचं नेतृत्व मान्य केलं जाणार का.

23 तारखेला नेमकं काय होणार याचं उत्तर या क्षणाला कुणालाच माहिती नाही. एनडीएचंच सरकार येणार असे दावे भाजपकडून गेले जात आहेत, तर दुसरीकडे यूपीएचे मित्रपक्षही गाफील नाहीत. भाजपला रोखण्यात यश आल्यावर पुढची तयारी आधीपासूनच असावी या हेतूने त्यांनी मित्रांची जुळवाजुळव सुरु केली आहे. संधी कुणाला मिळणार याचं उत्तर 23 तारखेच्या निकालावरच अवबंलून असेल.