Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session ) मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरुन गोंधळ काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र सध्या आहे. याच दरम्यान विरोधी पक्ष (Opposition) या मुद्द्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या एकजुटीने म्हणजेच 'इंडिया'च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. संसदेचं अधिवेशन सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. याच मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर भाष्य करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी संसदेच्या बाहेर या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, ही अत्यंत लज्जास्पद बाब असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पण पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर संसदेत येऊन भाष्य करावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मंगळवारी पार पडली विरोधी पक्षांची बैठक
मणिपूरच्या मुद्द्यावरुन अधिवेशनात दररोज गदारोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या संसदेत कोणत्याच मुद्द्यावर व्यवस्थित चर्चा होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवार (25 जुलै) रोजी याच मुद्द्यावर इंडियामध्ये सामील असलेल्या विरोधी पक्षांची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच बैठकीमध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधांनांना उत्तर द्यावं लागेल - संजय सिंह
संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांकडून आंदोलन देखील करण्यात आले. या मुद्द्यावर बोलताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी म्हटलं की, 'जो पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.' दरम्यान संजय सिंह यांना सोमवारी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी कामकाजातून निलंबित केले होते.
आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य करायला हवं. संपूर्ण जगात मणिपूरच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा होत आहे. मग भारताच्या संसदेत या मुद्द्यावर चर्चा का होत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.'