नवी दिल्ली : देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला.


अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं.

राजकीय नेत्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीईओपर्यंत आणि अर्थतज्ज्ञांपासून ते शेअर बाजारातल्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्व जण मान्सूनच्या या अंदाजाकडे डोळे लावून बसले होते. आयएमडीच्या या अंदाजानंतर सर्वांना दिलासा मिळाला.

मागच्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता. आयएमडीच्या दुसऱ्या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असं भाकीत होतं. मात्र मागच्या वेळी सरासरीच्या 97 टक्के इतका पाऊस पडला.

अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावेळी अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्त केली आहे. शिवाय स्कायमेट या देशातल्या खासगी संस्थेनेही यावेळी अल निनोमुळे सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरात अचानक उष्मा वाढल्याने वातावरणात जे असामान्य बदल घडून येतात, ज्याचा मान्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होतो. भारतात जून ते सप्टेंबर या काळात जवळपास 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळेच पडतो, ज्यावर देशातली बहुतांश शेतीचं सिंचन अवलंबून आहे.

सरासरी पाऊस म्हणजे किती?

887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.

गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.

देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.

2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस : स्कायमेट

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं होतं.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असेल. देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

जूनमध्ये 102 टक्के पाऊस होऊ शकतो. यामध्ये 70 टक्के शक्यता सामान्य पावसाची आहे, 20 टक्के शक्यता सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पावसाची आहे, तर 10 टक्के शक्यता कमी पाऊस होण्याची आहे.

जूननंतर जुलैमध्ये 94 टक्के, ऑगस्टमध्ये 93 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या :

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज


मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं


अल निनोचा यंदा ‘मान्सून’वर फारसा परिणाम नाही: हवामान विभाग