Monkeypox in India : तेलंगणामध्ये मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला आहे. परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं आढळली आहेत. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं आढळल्यानंतर त्याला ज्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तेलंगणा राज्य आरोग्य विभागाने अधिक माहिती देत रविवारी सांगितलं आहे की, कुवेतहून भारतात परतलेल्या एका रुग्णाला उपटारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू संसर्गासारखी लक्षणं आढळल्याने याला मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण मानलं जात आहे. हा रुग्ण 06 जुलै रोजी कुवेतहून भारतात परतला, त्यानंतर 23 जुलै रोजी त्याला ताप आला. 


रुग्णाच्या अंगावर पुरळ उठू लागलं


तेलंगणामधील या रुग्णाला 23 जुलै रोजी त्याला ताप येऊन अंगावर पुरळ उठू लागलं. या रुग्णाला आधी कामारेड्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर या रुग्णामध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं आढळल्याने त्याला आधी कामारेड्डी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर आता या संशयित रुग्णावर ज्वर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


संशयित रुग्णाचे नमुने पुणे येथे पाठवणार


या संशयित रुग्णाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्था (NIV) येथे पाठवले जाणार असून अहवाल येईपर्यंत या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये (Isolation Ward) ठेवण्यात येईल. आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं आहे, या व्यक्तीच्या संपर्कातील सहा जणांनाही देखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या सहा जणांमध्ये कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी सांगितलं आहे की, प्रशासनाकडून परिस्थितीनुसार योग्य उपाययोजना करण्यात येतील.


भारतात मंकीपॉक्सचे चार रुग्ण


भारतात आतापर्यंत चार रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात तीन रुग्णांची नोंद झाली होती. याआधी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या