President Ramnath Kovind Speech :  मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केले. "आजच्याच दिवशी पाच वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे मला भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून दिले होते. मी तुम्हा सर्व देशवासीयांचे आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावाना रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केल्या. 


"अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेले रामनाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासियांना संबोधित करत आहेत. यासाठी मी आपल्या देशातील चैतन्यशील लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला सलाम करतो. राष्ट्रपतींच्या कार्यकाळात माझ्या मूळ गावाला भेट देणे आणि माझ्या कानपूर शाळेतील वृद्ध शिक्षकांचे चरणस्पर्श करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल, असे कोविंद म्हणाले. 


रामनाथ कोविंद म्हणाले, आपल्या मुळाशी जोडलेले राहणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मी तरुण पिढीला विनंती करेन की त्यांनी त्यांच्या गाव किंवा शहराशी आणि त्यांच्या शाळा व शिक्षकांशी जोडून राहण्याची परंपरा पुढे  चालू ठेवावी. आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या आधुनिक राष्ट्राच्या निर्मात्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून आणि सेवेच्या भावनेतून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श साकारले होते. आपण फक्त त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात राहायचे आहे. 


"मूलभूत गरजा पूर्ण केल्यानंतर, प्रत्येक नागरिकाने त्याच्या क्षमतांचा वापर करून आनंदी होण्याचे मार्ग शोधणे आणि आपल्या सर्वस्वी व्यक्तिगत गुणांचा योग्य वापर करून आपले भविष्य घडविणे या बाबींची सुनिश्चिती करणे आवश्यक आहे. या दिशेने प्रगती करण्यासाठी शिक्षण हे मुख्य साधन आहे. युवा भारतीयांना त्यांच्या परंपरांशी जोडण्यासाठी तसेच एकविसाव्या शतकात स्वतःच्या पायांवर ठामपणे उभे राहण्यासाठी नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो, असा विश्वास रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.