MockDrill in India: जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड संसर्ग (Corona virus Cases) वाढल्यानं भीती व्यक्त केली जात आहे. असं असताना भारतात देखील सतर्कता बाळगली जाऊ लागली आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोना रुग्णांची (India Corona Cases updates) जर वाढ झाली तर ऑक्सिजन सपोर्ट आणि आयसीयू बेड, व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले बेड आणि इतर मानवी संसाधनांसोबत आपण किती तत्पर आहोत याची सुनिश्चितितता या माध्यमातून केली जाणार आहे. 


आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे की, देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनासंदर्भात आरोग्य सुविधांची खात्री करावी.  कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोविड केसेस वाढल्या तर या परिस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग किती तत्पर आहे. देशात जर कोरोनाचे रुग्ण वाढले तर आपण सामोरे जाण्यासाठी किती सज्ज आहे,  याबाबत मॉक ड्रील करण्यात येणार आहे. 


देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील


आरोग्य मंत्रालयाने सांगितले की,  27 डिसेंबर  रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉक ड्रीलचा उद्देश कोविड वाढला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता यावं हाच आहे.   


भौगोलिकदृष्ट्या प्रातिनिधिक आरोग्य सुविधांची उपलब्धता लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांचा समावेश करून हे मॉक ड्रील केले जाईल. बेडची क्षमता, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन आयसोलेशन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडवर लक्ष केंद्रित केलं जाईल. सोबतच डॉक्टर, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी यांच्या उपलब्धतेकडेही लक्ष दिले जाईल.  


आरोग्य सुविधांची पडताळणी होणार
 
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर टेस्टिंग क्षमता वाढवणे आणि RT-PCR, RAT किट्सची उपलब्धता, टेस्ट उपकरणांची उपलब्धता याबाबत देखील काळजी घेतली जाईल. आरोग्य मंत्रालयाने संसाधनांची उपलब्धता, अत्यावश्यक औषधांची उपलब्धता, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी, एसपीओ 2 प्रणाली, पीपीई किट, एन-95 मास्क इत्यादींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
राज्य, केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात येईल.