नवी दिल्ली : प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आता दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी थेट दिल्लीत धडक दिली आहे. आज क्रांतीदिनी दिल्लीतील अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र सदनाचा ताबा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी घेतला आहे.


दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सदनच आपल्या ताब्यात घेतलं आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांसह बच्चू कडू दिल्लीत दाखल झाले आहेत. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने दिव्यांग सहभागी झाले आहेत.  बच्चू कडू यांनी दोन वर्षापूर्वी दिव्यांग बांधवांचं मानधन वाढावं म्हणून आंदोलन केले होते. पण त्यावेळी फक्त आश्वासन दिले होते. मात्र त्या मागण्यांची अद्यापही पूर्तता न झाल्याने बच्चू कडू यांनी सरळ महाराष्ट्र सदनावरच कब्जा केला आहे.

खासदार-आमदार यांचा मानधन वाढत आहे पण दिव्यांगांना फक्त 200 रूपये दिले जाते. हा दिव्यांगांचा अपमान आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांचं मानधन वाढवावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

या आंदोलनाच्या वेळी दिल्लीच्या हिंदू महासभा भवनात 10 हजारांच्यावर दिव्यांग आंदोलक जमा झाले होते. मात्र या ठिकाणी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बच्चू कडू यांनी गनिमी कावा पद्धतीने महाराष्ट्र सदनाचा ताबा घेतला. या महाराष्ट्र सदनात हजारो अपंग बांधवांनी ठिय्या मांडला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र सदनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.