Udhayanidhi Stalin Tamil Nadu Deputy CM : नवी दिल्ली : तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरकारच्या वतीनं राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच, त्यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त नियोजन आणि विकास खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसी स्विकारल्या असून उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.


तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी व्ही. सेंथिल बालाजी, डॉ. गोवी आणि आर. राजेंद्रन, थिरू एसएम नस्सर यांच्या समावेशासह उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे. नवे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी 3.30 वाजता राजभवन, चेन्नई येथे होणार आहे. तसेच, तामिळनाडू सरकारनं नुकतंच सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या सेंथिल बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.


मुख्यमंत्र्यांकडून 'या' मंत्र्यांना हटवण्यासाठी शिफारस 


मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दूध व दुग्धविकास मंत्री टी. मानो थंगराज, अल्पसंख्याक कल्याण आणि अनिवासी तमिळ कल्याण मंत्री के. एस. मस्थान आणि पर्यटन मंत्री के. रामचंद्रन यांना मंत्रिपरिषदेवरुन हटवण्याचीही शिफारस केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीला देखील मंजूरी दिली आहे. 


दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मंगळवारी संकेत दिले होते की, उदयनिधि स्टालिन यांची तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच, मंत्रिमंडळात फेरबदल देखील संभव आहेत. 


उदयनिधींनी सनातनवर केलेल्या टिप्पणीमुळे अडचणी वाढलेल्या 


सनातनला केवळ विरोध करून चालणार नाही, असं उदयनिधी यांनी सनातन निर्मूलन परिषदेत सांगितलं होतं. त्यापेक्षा ते रद्द केलं पाहिजे. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते पुसून टाकायचं आहे. तसेच, सनातनलाही नष्ट करायचं आहे. मात्र, नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण आणि चुकीच्या पद्धतीनं पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, मी 'सनातन धर्म निर्मूलन' या परिषदेत सहभागी झालो होतो. मी तिथे 5 मिनिटं बोललो. पण भाजपनं माझा मुद्दा अतिशयोक्त केला आणि खोटं पसरवलं. त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले.दरम्यान, उदयनिधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पाहायला मिळालं होतं.