Ministry of Tourism : पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत युनायटेड एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम सोसायटी ऑफ इंडिया  (RTSOI) यांच्या सहकार्याने  राष्ट्रीय शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.  याप्रसंगी, शाश्वत आणि जबाबदार पर्यटन स्थळे विकसित करण्यावर भर देण्‍यात आला. पर्यटन मंत्रालयाने शाश्वत पर्यटन आणि जबाबदार प्रवासी मोहिमेसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे.


पर्यटन आणि पर्यावरण यांचा विशेष संबंध आहे. त्यांचा एकमेकांशी संवाद ही दुहेरी प्रक्रिया आहे. एकीकडे पर्यावरण संसाधने पर्यटनाच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित  पर्यटन स्थळे एक प्रकारे  पर्यटन संधी तयार करतात. ज्याचा पर्यटक आनंद घेतात, तिथे राहतात आणि आराम करतात. दुसरीकडे, अभ्यागत आणि यजमान समुदाय आणि स्थानिक वातावरण यांच्यातील जवळचे आणि थेट संबंध एक संवेदनशील परिस्थिती निर्माण करतात, ज्यायोगे पर्यटन अनेकदा  हानीकारक ठरु  शकते, परंतु त्याचबरोबर शाश्वत विकासासाठी खूप सकारात्मक देखील असू शकते असे मत पर्यटन सचिव अरविंद सिंग यांनी व्यक्त केले. कोविड-19 साथीच्या आजाराने पर्यटन  क्षेत्रातील विविध भागधारकांमधील लवचिकता, टिकाऊपणा आणि परस्परसंबंध यावर आपले लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले आहे.


स्वदेश दर्शन योजना


पर्यटकांना देशाच्या विविधतेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजना सुरु केली असल्याचे अरविंद सिंग म्हणाले. आतापर्यंत 76 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या योजनेतून आम्ही बरेच शिकलो आहे. आम्ही आता स्वदेश दर्शन 2.0  अशी सुधारित योजना तयार  केली आहे. स्वदेश दर्शन 2.0 ची कल्पना शाश्वत आणि जबाबदार पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दृष्टीकोनासह सर्वांगीण विकास करणे आहे. स्वदेश दर्शन  2.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना आम्ही शाश्वत विकास आणि जबाबदारीने करण्यासाठी विविध घटक लक्षात ठेवले आहेत. स्वदेश दर्शन 2.0 च्या माध्यमातून विविध प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये शाश्वत आणि जबाबदार पर्यटन पद्धती लागू केल्या जातील. ही योजना पर्यावरणीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक शाश्वतता यासह शाश्वत पर्यटनाच्या तत्त्वांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देईल, असेही ते म्हणाले. 


रणनिती  धोरण दस्तऐवज,  पर्यावरणीय शाश्वतता, जैवविविधतेचे संरक्षण, आर्थिक शाश्वतता, सामाजिक-सांस्कृतिक शाश्वततेला चालना, शाश्वत पर्यटन प्रमाणिकरणासाठी योजना, आयईसी  आणि क्षमता वाढ यांसारख्या शाश्वत पर्यटनाच्या विकासासाठीच्या योजनांना धोरणात्मक स्तंभ म्हणून ओळखले  जाते.



पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग यांच्या व्यतिरिक्त संयुक्‍त राष्ट्राचा भारतातील  प्रमुख शॉम्बी शार्प आणि आरटीएसओआयचे अध्यक्ष राकेश माथूर, तसेच शाश्वत पर्यटन आणि जबाबदार प्रवास क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांनी तसेच  राज्य सरकारांनी उपस्थितांना या एकदिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान वेगवेगळ्या सत्रांमध्ये मार्गदर्शन  केले. या शिखर परिषदेला विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, प्रशासन आणि विविध पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग संघटनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिव  अरविंद सिंग  यांनी परिषदेत  सहभागी झालेल्‍यांना जबाबदार प्रवासी बनण्यासाठी आणि जबाबदार पर्यटनाचे पुरस्कर्ते बनण्याची प्रतिज्ञा देखील दिली.