Ravi Shankar Prasad on Russia Ukraine War: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 3 तास थांबवले होते. रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला होता. भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तीन तासांचा युद्धविराम झाला होता. असं असलं तरी यापूर्वी केंद्र सरकारने युद्धबंदीबाबतचे असे दावे फेटाळले होते, मात्र आता पुन्हा एकदा भाजप खासदाराने हा दावा केला आहे.


माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दावा केला की, रशिया आणि युक्रेन युद्धात संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध तीन तास थांबवण्यात यश मिळवले होते. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, युद्ध शिगेला असताना ही घटना घडली आणि युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वैद्यकीय विद्यार्थी अडकले होते.


काय आहे रविशंकर प्रसाद यांचा दावा?


रविशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितले होते की, ते भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रात एकटं सोडणार नाहीत. त्यांच्या चर्चेनंतर भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी तीन तास लढाई थांबवण्यात आली. जगात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्थान आहे. याआधीही भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रशिया-युक्रेन युद्ध काही तासांसाठी थांबवल्याची बातमी मीडियामध्ये प्रसिद्ध झाली होती. परंतु 3 मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही 
पर्यावरणासाठी नव्या अभियानाची पंतप्रधान मोदी करणार सुरुवात, बिल गेट्सही होणार सहभागी