नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, देशाला वैमानिक पायलट प्रशिक्षणाचे केंद्र बनविण्याच्या उद्देशाने पाच विमानतळांवर आठ नवीन विमान उड्डाण प्रशिक्षण अकादमी स्थापन केल्या जातील. मंत्रालयाने सांगितलं की, यासाठी कर्नाटकातील बेळगाव आणि कलबुर्गी विमानतळ, महाराष्ट्रातील जळगाव, मध्य प्रदेशातील खजुराहो आणि आसाममधील लिलबाडी विमानतळांची निवड करण्यात आली आहे. असुरक्षित हवामान आणि नागरी किंवा सैनिकी हवाई वाहतुकीमुळे कमीतकमी व्यत्यय आणणारी परिस्थिती लक्षात घेऊन या विमानतळांची निवड केली गेली आहे.


पुढे बोलताना मंत्रालयाच्या वतीनं माहिती देण्यात आली की, ही आठ प्रशिक्षण केंद्रं स्थापन करण्यामागील उद्दीष्ट म्हणजे, भारताला एक प्रमुख जागतिक दर्जाचं उड्डाण प्रशिक्षण केंद्र बनविणं आणि प्रशिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रोख लावणं हा आहे. त्यासोबतच या प्रशिक्षण केंद्रांचं डिझाईन भारताच्या शेजारच्या देशांमधील विद्यार्थ्यांच्या विमान प्रशिक्षणासंदर्भातील आवश्यकता लक्षात घेऊन करण्यात येईल असंही मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं.  


दरम्यान, विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही आठ प्रशिक्षण केंदे स्थापन करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, "31 मे 2021 रोजी अकादमी तयार करण्यासाठी हे पत्र देण्यात आले. ज्यामध्ये आशिया-पॅसिफिक, जेटसर्व, रेडबर्ड, समवर्धने आणि स्काईनेक्स यांसारख्या सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आलं." ते म्हणाले की, एएआयने विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेचे पैलू, नियामक यंत्रणा, विमान चालवण्यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आणि उपकरणं, तसेच प्रशिक्षकांची उपलब्धता अशा निकषांच्या आधारे या निविदा दाखल करणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.


नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, "उड्डाण प्रशिक्षण केंद्रांच्या कामासाठी बोली लावणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एएआयने मासिक भाडे 15 लाखांवर आणले आहे. त्याचसोबत या निविदाधाकारांसाठी व्यवसाय अनुकूल करण्यासाठी विमानतळ रॉयल्टी ही संकल्पना दूर करण्यात आली."


महत्त्वाच्या इतर बातम्या :