श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
या हल्ल्यात शेजाऱ्यांची मुलगीही जखमी झाली आहे. मृत भाजप नेते राकेश पंडिता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते. पक्षात तरुणांना सामील करुन घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते राकेश पंडिता हे मुलगा ब्रज नाथसोबत काही कामाच्या निमित्ताने शेजारी राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
घरात घुसून गोळीबार
दहशतवादी घरात घुसले आणि राकेश पंडिता यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत आसिफा मुश्ताक या तरुणीलाही गोळ्या लागली. आसिफा ही मुश्ताक अहमद यांची मुलगी आहे. दोघांना गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान राकेश पंडिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक सैन्यासह घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण परिसराला वेढा दिला. शोधमोहीम सुरु करण्यात आली परंतु हल्लेखोर दहशतवाद्यांचा कोणताही पुरावा सापडला नाही. राकेश पंडिता हे या परिसरातील भाजपचे मोठे नेते होते.
उपराज्यपालांकडून दु:ख व्यक्त
तर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत राकेश पंडिता यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, "त्रालमधील नगरसेवक राकेश पंडिता यांच्या हत्येची बातमी ऐकून दु:ख झालं. मी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. राकेश पंडिता यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करतो."