नवी दिल्ली : देशातील सर्व राज्यांमध्ये उद्या (2 जानेवारी) ठराविक ठिकाणी कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज दिल्लीत होणाऱ्या ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर आरोग्यमंत्री म्हणाले, "लसी संदर्भात देशात गांभीर्याने प्रयत्न होत असून किमान दोन लसींनी औषध नियंत्रकांना मंजुरीसाठी अर्ज केला आहे."


डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, 'आम्ही पहिल्या टप्प्यात लसीच्या ड्राय रनसाठी पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकीदरम्यान बूथ स्तरापर्यंत तयारी केली जाते तसेच लसीकरणासाठीही अशीच तयारी केली जाते. पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात यावी यासाठी लोकांची यादीही तयार केली गेली आहे. प्रथम, लस आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणाऱ्यांना दिली जाणार आहे.


सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन होणार
देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे 2 जानेवारीला ड्राई रन घेणार आहेत. हे ड्राय रन सर्व राज्यांतील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत.


ड्राय रन ही प्रत्यक्षात लसीकरण करताना ज्याप्रमाणे नियोजन असते. तशाच प्रकारे होणार आहे. मात्र, या ड्राय रनमध्ये लस दिली जाणार नाही, फक्त लोकांचा डेटा घेतला जाईल, त्याला Co Win अ‍ॅपवर अपलोड केला जाईल. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बर्‍याच गोष्टींची चाचणी केली जाईल. याव्यतिरिक्त, लसीकरण AEFI म्हणजेच लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांनंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचा महत्त्वपूर्ण फोकस असेल.


चार राज्यात ड्राय रन यशस्वी
याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या झाली आहे. 28 आणि 29 डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आली.


देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. आता कोरोना विषाणूच्या नव्या विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत 25 हून अधिक लोकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. ज्यांचे नमुने नवीन स्ट्रेन साठी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वतंत्र खोल्यांमध्ये वेगळे केले गेले आहेत.