नवी दिल्ली : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या सावटाखाली असतानाच, चर्चा सुरु झाल्या आहेत त्या म्हणजे देशव्यापी लॉकडाऊनची. त्यातच ओढावणाऱ्या आर्थिक संकटाचीही धास्ती ओघाओघानं सतावू लागली. अशाच परिस्थितीमध्ये आता, देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यवसाय क्षेत्राला आश्वस्त केलं असून देशव्यापी लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 


लहान कंटेनमेंट झोन केल्या जातील, देशव्यापी लॉकडाऊन होणार नाही 


देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसऱ्या लॉकडाऊनपासून देश दूर नाही, अशीच चर्चा जोर धरु लागली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक स्थलांतरित मजुरांनी पुन्हा एकदा आपल्या गावची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या योजनांसंदर्भात फेडरेशन ऑफ इंडियन स्मॉल मीडियम एंटरप्राइजेज (फिस्मे) च्या अध्यक्षपदी असणाऱ्या, अनिमेश सक्सेना यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी चर्चा केली. यामध्येच सीतारमण यांनी देशव़्यापी लॉकडाऊन लागणार नसल्याची माहिती दिली. याचवेळी त्यांनी लहान कंटेनमेंट झोन केल्या जातील, अशी शक्यताही वर्तवली. 


Delhi Curfew News | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा 


सीतारमण यांच्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही परिस्थितीत राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी पडू देणार नाही, सोबतच देशात लसीकरण मोहिमेलाही चांगलीच गती देण्याचीही गरज आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 
एकिकडे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सक्तीच्या निर्बंधांची गरज आहे. पण, देशव्यापी लॉकडाऊन मात्र यावरील उपाय नसून अर्थव्यवस्थेला याचा फटका बसणार आहे, त्यामुळं परिस्थितीवर सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहे.