Delhi Curfew News कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. 


सोमवारी म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच (26 एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये 50 उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. 


पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. 


दिल्लीतील कोविड परिस्थिती 


रविवारी दिल्लीमध्ये कोविडचे सर्वाधिक म्हणजेच, 25,462 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या भागात संसर्गाचं प्रमाण वाढीस लागलं असून, त्याची सरासरी 29.74 वर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा, की चाचणीचा दर तिसरा नमुना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून येत आहे. मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 161 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 






देशातही कोरोनाचा आकडा धास्तावणारा 


देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं आतापर्यंत सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती.