नवी दिल्ली: राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर दारुच्या दुकानावर मद्यप्रेमींच्या उड्या पडल्याचं पहायला मिळालं. यावरुन प्रत्येकाला वाटलं की महाराष्ट्रात तळीरामांची संख्या सर्वाधिक असेल. पण नाही, महाराष्ट्राचा दारु पिण्यात महाराष्ट्राच्या पुढेही दोन राज्ये आहेत.


राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या आकडेवारीनुसार दारु रिचवण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन राज्ये दारु पिणाऱ्यांच्या संख्येत पुढे आहेत. तर बिहारमध्ये दारु बंदी असतानाही दारु पिणाऱ्यांच्या प्रमाणात ते राज्य महाराष्ट्राच्याही पुढं असल्याचं दिसून आलं आहे.


कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मद्यप्रेमींची दुकानासमोर कित्येक किलोमीटरची रांग लागल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याच्या तिजोरीत 7 हजार 807 कोटी रुपयांची भर पडली.


गोवा राज्य मागे
कदाचित हे वाचून आश्चर्यही वाटले असेल की ज्या गोव्यात दारु मुबलक आहे ते राज्य दारु पिणाऱ्यांच्या संख्येत मागे राहिले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 या अहवालानुसार तेलंगणामध्ये मद्य पिणाऱ्यांची संख्या देशात सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. दारुबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. मद्यपान करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे जास्त अंतर नाही.


सिक्कीममध्ये महिला सर्वात जास्त दारु पितात
ईशान्येकडील राज्य सिक्कीममध्ये मद्य पिणाऱ्या महिलांचे प्रमाण संपूर्ण देशात जास्त आहे. सिक्कीममधील 16.2 टक्के महिला मद्यपान करतात असं समोर आलं आहे. आसाममधील मद्य प्राशन करणाऱ्या महिलांची टक्केवारी 7.3 टक्के इतकी असून याबातीत हे राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. ज्याप्रमाणे तेलंगणातील मद्य प्राशन करणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त आहे त्याचप्रमाणे या राज्यातील महिलाही दारु रिचवण्यात पुढे असून महिलांच्या दारु पिण्याच्या बाबतीत या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.


देशाच्या अन्य भागाच्या तुलनेच ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात असं या अहवालातून स्पष्ट झालंय. शहरातील महिलांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण जास्त असते असेही म्हटले जाते. परंतु या अहवालानुसार शहरी महिलांपेक्षा खेड्यातील महिला या दारु पिण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला आपण दारु पितो हे सांगताना संकोच करीत नसल्याचंही अहवालात नमूद करण्य़ात आलं आहे.


दारुबंदी असणारे बिहार आघाडीवर
बिहारमध्ये दारुबंदी असतानाही या राज्यात दारु पिणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. बिहारमध्ये 15 वर्षावरील 15.5 टक्के लोक दारु पितात तर महाराष्ट्रात हे प्रमाण 13.9 टक्के इतकं आहे.


दारुपेक्षा तंबाखूचं सेवन जास्त
देशात दारुपेक्षा तंबाखूचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जातं असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नागरिकांनी तंबाखूपासून लांब राहावे म्हणून सरकार सतत प्रयत्न करीत असते पण त्याचा काहीही परिणाम नागरिकांवर झालेला नाही हे या अहवालातून स्पष्ट झालं आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यात मिझोरम देशात आघाडीवर आहे. मिझोरममधील 77.8 टक्के पुरुष आणि 65 टक्के स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात. तर केरळमध्ये तंबाखूचा वापर सगळ्यात कमी म्हणजे 17 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे दारु आणि तंबाखू सेवनाच्या बाबतीत गोवा खूपच मागे आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या: